आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटींच्या लॉटरीचे आमिष दाखवत ऑनलाइन चुना, रिझर्व्ह बँकेच्या नावाचा गैरवापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) आज ८० वर्षे पूर्ण झाल्याची बतावणी करून बँकेच्या नावाचा गैरवापर करत बनावट इ-मेल पाठवून ‘तुम्ही भाग्यवान ग्राहक ठरले आहात’, असे सांगितले जाते. तुम्हाला काही हजारांची नाही, तर तब्बल चार कोटींवर लॉटरी लागली आहे. पैसे तुम्हाला मिळतीलच, पण आधी काही हजार रुपयांच्या राशीत पैशांची मागणी तुमच्याकडे करून त्याच्या पाठपुराव्यासाठी इ-मेल आयडीही दिला जातो. या प्रकाराला काही जण भूलत असून, अनेकांची हजारो रुपयांची फसवणूक सुरू आहे.

दिवसभरात अनेक मेल येतात. परंतु, जेव्हा एखादी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा नामवंत संस्थेकडून मेल येतो. त्यावेळी तो आपण लगेच उघडतो. यापूर्वी काही आंतरराष्ट्रीय बँकांच्या नावाचा गैरवापर करून मेल पाठवून अशा प्रकारची फसवणूक होत होती. परंतु, या वेळी थेट आरबीआयच्याच नावाचा गैरवापर करत बनावट मेल पाठविला जात असल्याने काही त्याला भूलत आहेत.शहरातील विद्यार्थी, अभियंता आणि व्यापा-यांना असे बनावट मेल आल्याची बाब समोर आली आहे.

आरबीआयची स्थापना एप्रिल १९३५ या दिवशी झाली. बुधवारी बँकेने ८० वर्ष पूर्ण केले, असे खोटे सांगून भाग्यवान ग्राहक ठरल्याची बतावणी करत लॉटरीचे आमिष दाखवून हे बनावट मेल पाठविले जात आहेत. बुधवारी सकाळी शहरातील एका विद्यार्थिनीला असा मेल आला. तुम्हाला चार कोटी ७६ लाख ४० रुपयांचा लकी ड्रॉ लागल्याची माहिती देण्यात आली. पण, आधी तुम्हाला काही पैसे आमच्या खात्यात भरावे लागतील, असे सांगण्यात आले. rbicompersation.93@hotmail.com या इ-मेलवर तुमचे नाव, पत्ता, वय, इ-मेल आयडी, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, शाखा अशा प्रकारची माहिती पाठवा, असे सांगण्यात आले होते. काही जणांनी भुलून ही माहितीही पाठवली आहे.

यापूर्वीही नावाचा गैरवापर
दोन वर्षांपूर्वी आरबीआय तसेच या बँकेचे गव्हर्नर यांच्या नावाचा गैरवापर करून काहींनी बनावट मेल पाठवून काही जणांची आर्थिक फसवणूक केली होती. परंतु, सायबर सेलला या भामट्यांचा शोध लागला नाही.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार तक्रार
आरबीआयच्या नावाचा गैरवापर करून होणा-या या फसवणुकीबाबत थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे तक्रार करणार आहे. तसेच अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी विशेष समिती तयार करण्याचीही मागणी करणार आहे.
देवयानी फरांदे, आमदार

अशा मेलकडे करा दुर्लक्ष...
आरबीआयकडून कधीही लॉटरी अथवा बँकेची माहिती मागणारे मेल येत नाहीत. त्यामुळे असे मेल आल्यास ते बनावट समजून त्याकडे दुर्लक्ष करावे.
संदीप दिवाण, पोलिस उपआयुक्त, सायबर गुन्हे शाखा

आरबीआय असे मेल करत नाही...
आरबीआयअसे मेल कधीच पाठवत नाही. असे मेल किंवा एसएमएस आल्यास कुठलीही वैयक्तिक माहिती नागरिकांनी देऊ नये. अॅड.श्रीधर व्यवहारे, माजी सदस्य, स्क्रीन कमिटी, आरबीआय