आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीतील सशस्त्र टोळी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सरकारवाडा पोलिसांच्या गस्त पथकाने सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीघांना पाठलाग करून पकडले. यामध्ये दोन संशयित पसार झाले. संशयितांच्या या टोळीकडून पोलिसांनी रिक्षासह चाकू व दांडके जप्त केले.

सोमवारी मध्यरात्री 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास भरपावसात चोपडा लॉन्सजवळून अंधारातून जाणार्‍या रिक्षाचालकास पोलिसांनी थांबण्याची सूचना करताच त्याने वेगाने रिक्षा हाकत पळ काढला. तब्बल तासभर पोलिसांना गुंगारा देत गल्लीबोळातून मार्ग काढत असतानाच पोलिसांनी पाठलाग करून रिक्षाचालकाससह तिघांना ताब्यात घेतले. मात्र, दोघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. या तिघांची झडती घेतली असता चाकू, फायटर व रिक्षात दांडा पोलिसांना मिळाला असून, ते दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे व उपनिरीक्षक संदीप कांबळे, जीपचालक शिंदे, पाटील यांच्यासह पथक रात्री गस्त घालीत असताना चोपडा लॉन्सकडून पांढरे हूड असलेली रिक्षा (एमएच 15, एके 5590) थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, रिक्षाचालकाने भरधाव वेगाने राठी आमराई, गंगापूररोड मार्गे जुना गंगापूर नाका, पंडित कॉलनीतील ज्योती स्टोअर्सकडून ठक्कर रिट्रेडकडे वळण घेत असतानाच रिक्षा उलटी झाली. तोच मागून आलेल्या निरीक्षक सपकाळे व पथकाने रिक्षातून पळून जाणार्‍यांना तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये संशयित मोहम्मद अली रोशन अली शेख, इम्रान कय्यूम पठाण (रा. पंचशीलनगर), तज्जूम शेख अब्दुल रहीम (रा. बडी दर्गा) यांच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर फरारींमध्ये बाबा व फिरोज शेख यांचा समावेश असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सपकाळे यांनी सांगितले. दरम्यान, संशयितांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.