आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily Bhaskr Group Chairman Rameshchandra Agrawal Speakiing At Nashik

स्वयंपूर्ण महिला घडवतात देश- ‘दैनिक भास्कर समूहा’चे चेअरमन अग्रवाल यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-‘उत्कृष्ट नियोजनाचे कौशल्य केवळ महिलांकडेच असते. घरातल्या बारीकसारीक गोष्टींच्या व्यवस्थापनापासून ते नोकरीच्या ठिकाणी कौशल्यपूर्ण नियोजन करण्यापर्यंत महिला वाक्बगार असतात. त्यामुळे त्यांचे स्वावलंबन हे घर व नोकरी अशा दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीतीने पाळून स्वत:बरोबरच संपूर्ण देश घडवत असते’, असे प्रतिपादन ‘दैनिक भास्कर समूहा’चे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी केले. सृजनशीलतेतून महिलांनी स्वत:बरोबर समाजाचादेखील विकास साधणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कॅट वुमन्स इंटरप्रिनर्स ऑर्गनायझेशन (सीडब्ल्यूइओ) या महिलांना उद्योजकतेसाठी सहकार्य व प्रोत्साहन देऊन त्यांना स्वयंपूर्ण करणार्‍या राष्ट्रीय संस्थेच्या नाशिक शाखेचे उद्घाटन अशोका इंजिनिअरिंग हॉल येथे एका सोहळ्यात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सीडब्ल्यूइओच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा सेठी यांनी संस्थेच्या वर्षभरातील उपक्रमांचे नियोजन मनोगतातून विशद केले. तसेच, ग्रामीण भागातील गरीब महिलांपर्यंत ‘सुविधा’ हा सॅनिटरी नॅपकिन्स वाटपाच्या राजस्थानमध्ये यशस्वी झालेल्या उपक्रमाविषयीही त्यांनी माहिती दिली. व्यासपीठावर स्वाक्षरी तथा लोगोतज्ज्ञ माणकलाल अग्रवाल, नगरसेवक आकाश छाजेड, ललित गांधी, प्रियांका अग्रवाल उपस्थित होते. संस्थेच्या नाशिक शाखा उपाध्यक्षा तथा प्रमुख संयोजिका सुरुची पोद्दार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी ललित गांधी यांनी सॅनिटरी नॅपकिन्स वाटपासारख्या उपक्रमांना ‘मारवाडी युवा मंच’ने केलेले सहकार्य, तसेच मारवाडी अधिवेशनाद्वारे नाशिकमध्ये उद्योजकतेला दिलेले प्राधान्य याविषयी माहिती दिली. सभागृहात ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, तसेच मारवाडी युवा मंचच्या सुरेखा कांकरिया, अमित बोरादेखील उपस्थित होते.

महिलांचा झाला गौरव
सोहळ्यात घरकूल या तरुण गतिमंद मुलींसाठी काम करणार्‍या संस्थेच्या विद्या फडके, निराधार वृद्धांसाठी काम करणार्‍या क्लेरा मोझेस, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणार्‍या दिशा संस्थेच्या सुधा मेहता यांच्यासह सामाजिक कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सीडब्ल्यूइओ संस्थेत सामील होऊ इच्छिणार्‍या ज्योती आहेर व कविता नेरकर यांचेही स्वागत करण्यात आले. त्यांच्यामार्फत महिलांना शिलाईचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्वाक्षरीवर आधारित मार्गदर्शन
स्वाक्षरी तज्ज्ञ माणकलाल अग्रवाल यांनी या वेळी स्वाक्षरीच्या माध्यमातून आपल्यात सक्षमता आहे किंवा नाही, हे कसे ओळखायचे याचेही प्रात्यक्षिकासह उदाहरण दिले. स्वच्छ, मोठय़ा व स्पष्ट अक्षरातली स्वाक्षरी सक्षमता व बहिर्मुख व्यक्तिमत्त्वाचे लक्षण असते, असे ते म्हणाले.