आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवघेणी ‘परीक्षा’ रोजचीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - के. के. वाघ कॉलेजच्या प्रवेशद्वारापासून जवळच उड्डाणपूल उतरवण्यात आला आहे. या उतारामुळे या भागातून ओझरकडे जाणारी वाहने अतिशय वेगाने मार्गक्रमण करतात. याशिवाय द्वारकेला बाजूला जाणार्‍या वाहनांचाही वेग अर्मयादित असतो. अशा या वेगाच्या स्पर्धेला छेदत विद्यार्थीवर्ग रस्ता ओलांडण्याची कसरत करीत असतो. ओझरकडे जाणार्‍या बसेस कॉलेज प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला उभ्या राहतात. त्यामुळे त्या बाजूला जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी रस्ता ओलांडण्याशिवाय पर्यायच नसतो.

महामार्गावरच केली जाते प्रतीक्षा :
कॉलेजमधील विद्यार्थी महामार्गावरच उभे राहून बसची प्रतीक्षा करतात. वास्तविक, सर्व्हिसरोडने शहर बस व अन्य बसला प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु सर्व्हिसरोडच अपूर्ण असल्याचे कारण देत बसचालक सर्रासपणे महामार्गावरच बस थांबवतात. महामार्गावर भरधाव वेगाने येणारी वाहने आणि त्यातच बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी धावपळ यामुळे या भागात अपघात हे बघितले, तरी किती भयावह आहे याची कल्पना येते.

प्राध्यापकांची वाहने रस्त्यावरच :
के. के. वाघ संस्थेचा परिसर भव्य असला तरीही याच संस्थेत कार्यरत असलेले काही प्राध्यापक व विद्यार्थी आपली चारचाकी वाहने सर्व्हिसरोडवरच उभी करतात. त्यामुळे हा रस्ता अधिक अरुंद होऊन वाहतुकीला खोळंबा होतो.

वाहतूक पोलिसांचा अभाव :
विद्यार्थीवर्ग जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असताना या भागात एकही वाहतूक पोलिस नसतो. त्यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघातही होण्याची भीती व्यक्त होत आहे. या भागात दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

तिगरानिया चौकही धोकेदायक :
तिगरानिया चौकात तब्बल सात रस्ते एकवटतात. परंतु, या भागात वाहतूक पोलिसच तैनात करण्यात आलेले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्यापरीने वाहन चालवतो. त्यातून अपघातही होत असतात. महामार्गावरून येणारी भरधाव वाहने आणि महामार्ग ओलांडत तिगरानिया कॉलनीकडे जाणारी वाहनेही या चौकात एकत्र येत असल्यामुळे दिवसभर या भागात वाहतुकीची कोंडी असते.


औरंगाबाद नाका सिग्नल शोभेचाच!
औरंगाबाद नाका परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आजवर प्रभावी उपाययोजना झालेली नाही. या भागात काही दिवसांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, विजयनगरकडे जाणार्‍या रस्त्याला या सिग्नल यंत्रणेचा उपयोगच होत नसल्यामुळे हे सिग्नल सध्या बंद करण्यात आला आहे. यापूर्वी विजयनगर भागातून सिग्नल ओलांडणारा रस्ता बंद करण्यात आला होता. परंतु महापालिकेने तो पूर्ववत सुरू केल्याने एकाच चौकात वाहनांची गर्दी होते. त्यात सर्वच बाजूंनी जाणारी वाहने असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी नागरिकांना या वाहतुकीचा त्रास होत असतो.


स्पीडब्रेकरची गरज
कॉलेजच्या भागात रस्ता ओलांडतांना आम्हाला फार त्रास होतो. त्यामुळे या भागात स्पीडब्रेकर गरजेचा आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास या भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या भागात अंडरपास करण्यात आल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयीचे होईल. गौरव सूर्यवंशी, विद्यार्थी


स्काय वॉक करावा
कॉलेजसमोर सिग्नल यंत्रणा बसविल्यास वाहतुकीचा खोळंबा होईल. शिवाय सिग्नल सुटल्यानंतर बस उभी राहणेही अवघड होईल. त्यामुळे येथून स्काय वॉकची व्यवस्था करावी. तसेच वाहनांवरील वेगाला र्मयादा घालण्यासाठी स्पीडब्रेकर बांधण्यात यावा. कुणाल बाफणा, विद्यार्थी


.. तर समस्या कमी
औरंगाबादरोड-विजयनगर हा रस्ता बंद केल्यास औरंगाबाद नाक्यावरील वाहतुकीची समस्या कमी होईल. यापूर्वी आम्ही तसा प्रयत्न केला होता. परंतु, महापालिकेने हा रस्ता पुन्हा खुला केला. त्यामुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा होतो. याचा त्रास आम्हाला व नागरिकांना होतो. विष्णू हळदे, वाहतूक पोलिस