आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रथेला फाटा: धरणातून विसर्ग तरी जलपूजनाचा विसर; विरोधकांचा संताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- समाधानकारक पाऊस पडण्याचे भाग्य सर्वच महापौरांना लाभते असे नाही. आजवर ज्यांच्या कारकिर्दीत चांगला पाऊस झाला आणि गंगापूर धरण भरले त्या त्या वेळी संबंधितांनी जलपूजन करून आपले कर्तव्य बजावले. यंदा धरण भरून त्यातून दोन विसर्गही करण्यात आले; मात्र आजवर जलपूजनाचा कार्यक्रमच झालेला नाही. ही उदासीनता म्हणजे सत्ताधार्‍यांचे कर्मदारिद्रय़ म्हणावे की नाशिककरांचे दुर्भाग्य, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पावसाळ्यात गंगापूर धरण भरल्यानंतर त्याचे पूजन करण्याची प्रथा वर्षानुवर्षांपासून पाळली जात आहे. सामान्यत: महापौर, नगरसेवक व अधिकारी धरणाला भेट देऊन त्यानंतर र्शीफळ अर्पण करून पूजन करतात. धरणाचे पूजन हे केवळ धार्मिकतेचे प्रतीक नसून, निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते एक माध्यम असते. म्हणूनच धरण पूजनाची प्रत्येकालाच प्रतीक्षा असते. धरणाचे पूजन झाले म्हणजे वर्षभराचा पाणीप्रश्नही सुटला, असा संदेश त्यातून नाशिककरांपर्यंत अपसूकपणे पोहोचतो. परंतु, हा आनंद शहरवासीयांना मिळूच नये, अशाच भूमिकेतून सत्ताधारी वावरत आहेत. धरणातील जलपूजनाचा विसर पडणे ही बाब त्यातीलच एक म्हणावी लागेल.

गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने धरण पूजनाची संधी विद्यमान महापौरांना मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा ते पूजनासाठी उत्सुक असतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात महापौरांनीच या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. दोन वर्षांपूर्वी जलपूजनावरून मोठी राजकीय सुंदोपसुंदी झाली होती. तत्कालीन महापौर नयना घोलप या गावी गेल्याचे निमित्त साधत स्थायी समितीचे तत्कालीन सभापती संजय साबळे, शिवसेनेचे तत्कालीन गटनेते अशोक गवळी व नगरसेवक अजय बोरस्ते यांनी धरण पूजन परस्पर उरकवले होते. यावर कडी करीत त्याच दिवशी सायंकाळी तत्कालीन आयुक्त भास्कर सानप, तत्कालीन उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांनी पुन्हा धरण पूजन केले होते. यंदा मात्र पूजनाच्या स्पर्धेत कोणीही नसतानाही मनसेने धरणाच्या बाबतीत बघ्याची भूमिका घेतल्याने विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे.

महत्त्वाच्या विधीचाच पडला विसर
नाशिककरांची तृष्णा भागविण्याचे काम गंगापूर धरण करीत असते. मात्र, गेल्या वर्षी दुर्दैवाने कमी पाऊस झाल्याने धरण पूर्णत: भरले नव्हते. त्यामुळे जलपूजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला नव्हता. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्याने धरण शिगोशीग भरले आहे. परंतु, आपल्याच मस्तीत मश्गुल असणार्‍या सत्ताधार्‍यांना या महत्त्वाच्या विधीचाही विसर पडला आहे. नाशिककरांचेच हे दुर्दैवच म्हणावे.
-अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

शहरवासीयांचेही विस्मरण
मनसेच्या नेत्यांमध्ये आपापसात ताळमेळ नसल्यामुळेच धरणातील जलपूजनाचे त्यांना विस्मरण झाले आहे. धरण पूजनाचेच काय; पण या मंडळींना शहरवासीयांचादेखील विसर पडला आहे. शहरातील खड्डे आणि अन्य प्रश्नांवरून याची प्रचिती येते. आज मनसेचे आमदार विधानसभेत आवाज उठविण्याऐवजी प्रभाग सभांना उपस्थित राहत आहेत. यावरूनच या पक्षाचा दृष्टिकोन लक्षात येतो.
-लक्ष्मण जायभावे, गटनेता, काँग्रेस

न उमजणारी बाब
धरणाच्या पूजनावर विश्वास नाही, याचा अर्थ मनसेचा निसर्गावरच विश्वास नाही. धरण पूजनाला विलंब करणे ही न उमजणारी बाब आहे. शहरात यंदा भरपूर पाऊस पडलेला असताना आणि गंगापूर धरणही तुडुंब भरलेले असताना पाणी कपात रद्द करण्याचे कर्तव्यही महापौरांना पाळता आलेले नाही. म्हणूनच जनतेची त्यांच्यावरील नाराजी वाढत आहे.
-विनायक खैरे, गटनेता, राष्ट्रवादी कॉँग्रेस

महापौर जलपूजन लवकरच करतील
हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे जलपूजन होणे आवश्यक आहे; परंतु महापौर बाहेरगावी गेल्यामुळे धरणातील जलपूजन होऊ शकले नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आम्ही जलपूजनासाठी आग्रही आहोतच. महापौर लवकरच पूजनाचा कार्यक्रम आयोजित करतील, अशी अपेक्षा आहे. - -संभाजी मोरुस्कर, गटनेता, भाजप