आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाटक्या नोटांशी ‘असहकार’; काउंटर उघडण्याच्या आदेशावर कार्यवाही नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फाटक्या नोटा बदलण्यासाठी सहकारी बँकांमध्येही काउंटर उघडणे बंधनकारक करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने काढून दीड महिना उलटला असला तरी अद्याप बहुतांश सहकारी बँका याबाबत अनभिज्ञ आहेत. इंटरनेटच्या जमान्यात आजही सहकारी बँका लेखी आदेश आणि टपालाच्याच भरवशावर असल्याचे चित्र यातून स्पष्ट झाले आहे.

रिझर्व्ह बँकेने यापूर्वी 17 एप्रिल 2012 ला आदेश तसे काढले होते. मात्र, त्याला हवा तो प्रतिसाद न मिळाल्याने 28 जानेवारी 2013 ला नवा आदेश काढून खास मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार आता देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना फाटक्या नोटा बदलून देण्यासाठी वेगळे काउंटर सुरू करण्यास सांगितले आहे. यापूर्वी जुन्या नोटा बदलायच्या म्हटल्या की स्टेट बॅँकेतच लोक जात.

असे ठरत असते नोटेचे मूल्य
नोट कशी, कुठे आणि किती फाटली आहे, त्यावर त्या नोटेचे मूल्य निश्चित होते. हे मूल्य कसे ठरवावे, याबाबतचीही मार्गदर्शक तत्त्वे रिझर्व्ह बॅँकेने ठरवून दिली आहेत. म्हणजे 100 रुपयांची फाटकी नोट बदलून घेतली तर त्या बदल्यात 100 रुपयेच परत मिळतील असे नाही. विशेष म्हणजे कापली जाणारी रक्कम बँकेला कमिशन म्हणूनही मिळत नाही.

ग्राहकांसाठी लाभदायी
फाटक्या नोटा आता सर्व राष्ट्रीयीकृतसह सहकारी बॅँकांतही मिळतील. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या नेहमीच्या बँकेत नोटा बदलून मिळू शकतील. ग्राहकांचे श्रम, वेळ यामुळे वाचणार असून, नोटा बदलण्याच्या कामासही वेग येईल. आमच्या बहुतांश शाखांत ही सुविधा उपलब्ध आहे.
-बाबुलाल बंब, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, स्टेट बॅँक

निर्देश नाहीत
पूर्वी रिझर्व्ह बँकेचे नवे निर्देश बँकांपर्यंत टपालाने येत, पण आता येत नाहीत. फाटक्या नोटांबाबतही आमच्यापर्यंत काहीच निर्देश आलेले नाहीत. आम्ही मात्र फाटक्या नोटा व्यवहारात स्वीकारतो आणि त्यांचा स्टेट बँकेत भरणा करतो.
-धनंजय कुलकर्णी, उपाध्यक्ष, जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन

कोणतेही आदेश आलेले नाहीत
आमच्याकडे याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. आमची बँक ग्रामीण भागापर्यंत पसरलेली असल्याने भरण्यात फाटक्या नोटांचे प्रमाणही जास्त असते. पण, आम्ही त्या स्वीकारतो आणि स्टेट बॅँकेत जमा करतो.
-सुभाष देसले, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅँक