आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Damanganga Govdavari Link Project Inducted In Kokan Valley

दमणगंगा-गोदावरी लिंक याेजनेचा काेकण खाेरे बृहत् आराखड्यामध्ये समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहराची लाेकसंख्या सध्याच्या जनगणनेनुसार २०४१ मध्ये ४५ लाखांवर पाेहाेचणार अाहे. त्यावेळी शहराची गरज भागविण्यासाठी दररोज ३४ दशलक्ष घनफूट पाणी लागेल. म्हणजेच महापालिकेला एका वर्षात १२,४१० दशलक्ष घनफूट पाणी राखून ठेवणे अावश्यक ठरेल. ही गरज भागविण्यासाठी दमणगंगा-गोदावरी लिंक योजना राबवणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून दीड वर्षापासून या योजनेचा पाठपुरावा सुरू असून, त्याला यश येऊ लागले अाहे.
२९ जानेवारी २०१६ रोजी या योजनेचा कोकण खोरे महामंडळाच्या बृहत् आराखड्यात समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा अंदाजित खर्च १६०० कोटी इतका आहे. या याेजनेंतर्गत उपलब्ध हाेणारे पाणी गंगापूर धरणात अाणण्यात येणार असून, ती पूर्ण झाल्यावर नाशिकच्या विकासासाठी हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध हाेईल. राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एप्रिल २०१५ मध्ये दमणगंगा (एकदरे)-गोदावरी लिंक योजनेस तत्त्वतः मान्यता देऊन सदर योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे पत्र राष्ट्रीय जलविकास अभिकरणास दिले हाेते. या योजनेत दमणगंगा नदीवर एकदरे गावाजवळ ५००० दशलक्ष घनफूट इतक्या क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. २१० मीटर उपसा करून हे पाणी कश्यपी धरणात टाकण्यात येणार आहे. तेथून पुढे प्रवाही मार्गाने ते पाणी धरणात येईल. अशा प्रकारे नाशिकच्या विकासासाठी ५००० दशलक्ष घनफूट पाणी अतिरिक्त उपलब्ध होणार आहे.
सिन्नर-शिर्डीसाठीगारगाई-वैतरणा-कडवा-देव नदी लिंक :सिन्नर तालुक्यासाठी ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देव नदी लिंक’ योजनेस राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणास बनविण्यास सांगण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्र राज्य शासनाने दि. २० ऑगस्ट २०१५ रोजीच्या हैदराबाद कार्यालयाला पाठविलेले आहे. या लिंक योजनेत गारगाई तीन नाले यावर चार धरणे बांधून ती एकमेकास कालव्याद्वारे जोडून हे पाणी उपसा करून वैतरणा धरणात टाकण्याचे प्रस्तावित आहे. वैतरणा धरणातून पुढे ते पाणी थेट पाइपलाइनद्वारे कडवा धरणात टाकण्यात येईल. तेथून पुढे उपसा योजनेद्वारे (लिफ्ट) सोनांबे शिवारात देवनदीच्या उगमात टाकण्यात येईल. सोनांबे येथील धरणातून १.५ टीएमसी पाणी देवनदीच्या उगमात सोडण्यात येईल. उर्वरित पाणी तेथून पुढे उच्चस्तरीय कालवा काढून डुबेरे-रामोशीवाडी-दापूर-दोडी-नांदूर शिंगोटे या गावांच्या मार्गे भोजपूर कालव्यास जोडण्यात येईल.

नाशिक-नगर-मराठवाड्यासाठीवाल (आडगाव)-वैतरणा लिंक : दमणगंगा-पिंजाळलिंकमधून २०००० दशलक्ष घनफूट पाणी मुंबईस देण्यात येणार आहे. त्याबदल्यात वैतरणा धरणाचे ११००० दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात नाशिक-नगर-मराठवाड्यासाठी वळविण्याचे राज्य सरकारने प्रस्तावित केले आहे. याशिवाय, वाल (आडगाव)-वैतरणा लिंक या नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव खासदार गोडसे इंजिनिअर जाधव यांनी राज्य सरकारला सुचविला आहे. यामध्ये वाल नदीवर आडगाव येथे ५००० दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधून ते पाणी ३०० मीटर उपसा करून वैतरणा धरणात टाकण्यात येणार आहे. तेथून पुढे ते नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध होईल. नाशिक जिल्ह्याचा समावेश दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात झाला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी पाणी आवश्यक असून, ते वाल (आडगाव)-वैतरणा लिंकद्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच, हे पाणी दुष्काळी भागास ठिबक सिंचनासाठीही उपलब्ध होणार आहे.

ही अाहे सद्यस्थिती : सद्यस्थितीत गंगापूर धरणातून नाशिकला थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. १६ लाख लोकसंख्येसाठी दररोज १२ तर वर्षभर ४३८० दशलक्ष घनफूट इतके पाणी लागते. मात्र, गंगापूर धरणाची क्षमता गाळामुळे कमी झाली असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास ५६०० दलघफू इतका पाणीसाठा होतो. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार त्यापैकी ४० टक्के पाणी दरवर्षी जायकवाडी धरणात सोडावे लागणार आहे. त्यामुळे नाशिक शहरास ३३६० दलघफू इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. यावर्षीसुद्धा १३०० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून जायकवाडीस सोडण्यात आले. त्यामुळे नाशिककरांवर पाणीकपात सहन करण्याची वेळ आली आहे.

सातत्याने हाेणाऱ्या पाठपुराव्याला यश
गोदावरी खोरे तुटीचे असून, नाशिक-नगर-मराठवाड्यात जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत प्रादेशिक वाद आहेत. उपलब्ध पाणी भविष्याची गरज लक्षात घेऊन गोदावरी खोऱ्यात उत्तर कोकणातील दमणगंगेचे पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला या याेजनेच्या समावेशामुळे यश येत अाहे.