आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामिनी पथक रोखणार नवरात्रोत्सवातील वीजचोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- वीजचोरी टाळण्यासाठी महावितरण कंपनीने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवातही सार्वजनिक मंडळांवर नजर ठेवण्यासाठी दामिनी पथक तैनात केले आहे.

दामिनी पथक व घरगुतीपेक्षा कमी वीजदरामुळे गणेशोत्सवात वीजचोरीला आळा बसला. या काळात परिसरातील 472 गणेश मंडळांनी अधिकृत पुरवठा घेतल्याने नवरात्र उत्सवासाठीही तोच दर कायम ठेवण्यात आला आहे.

दामिनी पथकाची दहशत

गणेशोत्सवाप्रमाणे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांवर महावितरणचे दामिनी पथक नजर ठेवणार आहे. उत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी नसलेल्या मंडळांना दामिनी पथक भेट देऊन अपघात टाळण्याकरिता सुरक्षा व वीज चोरीच्या परिणामांची जाणीव करून देणार आहे. मंडळांनी अधिकृत जोडणी घ्यावी; अन्यथा पुरवठा खंडित करून कारवाई होणार आहे. अधिकृत जोडणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून, महावितरणच्या संकेतस्थळावरून नवीन जोडणीकरिता ऑनलाइन अर्ज करणार्‍यांना तीन दिवसांत जोडणी देणार आहे.


पथकाकडून कारवाई
दामिनी पथकाने गणेशोत्सवात शहरातील 472 मंडळांना भेटी दिल्या. पथक, कंपनीच्या आवाहनाला प्रतिसाद देत 220 मंडळांनी कमी दरात तात्पुरती जोडणी घेतली. 186 मंडळांनी घरगुती, तर 63 मंडळांनी व्यावसायिक दराने जोडणी घेतली.

मंडळांना दक्षता घेण्याचे आवाहन
नवरात्रोत्सवासाठी लागणारी वीज अधिकृत कंत्राटदारांकडूनच घ्यावी. वायर्स सक्षम नसल्यास शॉर्टसर्किट होऊ शकते. त्या लूज किंवा तुटलेल्या असल्यास पुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे दक्षतेचे आवाहन कंपनीने केले आहे.

सवलतीत वीज
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 27 पैसे अधिक इंधन अधिभार असा वीजदर आहे. घरगुती दरापेक्षाही हा दर कमी आहे. घरगुती, वाणिज्य जोडणीतून घेतलेला अनधिकृत वीजपुरवठा आर्थिकदृष्ट्या महाग आहे.

तडजोड नको
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक मंडळांनी वीज सुरक्षेबाबत तडजोड करू नये. अनधिकृत जोडणी केल्यास दामिनी पथकाद्वारे कारवाई केली जाईल. के. व्ही. अजनाळकर, मुख्य अभियंता, नाशिक परिमंडल.