आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक एमआयडीसीत विषारी कचरा डंप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एमआयडीसीचे मोकळे भूखंड ‘डंपिंग ग्राउंड’ बनू लागले आहेत. कालबाह्य औषधांनी भरलेला ट्रक शुक्रवारी सकाळी डम्पिंगच्या तयारीत असताना आयमाच्या पदाधिकार्‍यांनी पकडला. या ट्रकमध्ये 2009 साली कालबाह्य झालेली इंजेक्शनसारखी औषधे आहेत. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात वापरण्याची असल्याने लाखोंच्या औषधांची विल्हेवाट भंगारबाजारात लावल्याचे स्पष्ट होत आहे.

येथील वेअर हाउसजवळील मोकळ्या भूखंडावर हे डम्पिंग सुरू होते. त्याच्या दर्पामुळे काही कंपन्यांतील कामगारांना त्रास होऊ लागला. आयमाला त्याची माहिती दिल्यानंतर अध्यक्ष सुरेश माळी, निखिल पांचाल, राजेंद्र अहिरे, नगरसेवक उत्तम दोंदे तेथे पोहोचले. येथे औषधांनी भरलेला ट्रक (एमएच 15, एजी 5377) डम्पिंग केला जात होता. माळी यांनी मनपा, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, अंबड पोलिसांना कळवल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

सर्व काही संशयास्पद : या औषधांत सोडियम क्लोराइड इंजेक्शन बीपी असा उल्लेख आहे. कित्येकांवर किंमतच नाही, तर अनेक इंजेक्शन्सवर ‘फक्त सरकारी उपयोगासाठी’ असा उल्लेख आहे. 2009 साली ही औषधे कालबाह्य झाली आहेत.

कालबाह्य झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत औषधे नष्ट करणे बंधनकारक असताना, त्या कंपनीने जबाबदारी पार पाडलेली दिसत नाही. ही औषधे भंगारबाजारापर्यंत कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आणि कशी पोहोचली, याच्या तपासाचे आव्हान आहे.

उद्योजक, कामगारांच्या आरोग्यास धोका
एमआयडीसीच्या भूखंडांवर भंगार विक्रेतेही डम्पिंग करू लागले. यामुळे हजारो कामगार आणि उद्योजकांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. एमआयडीसीने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. सुरेश माळी, अध्यक्ष, आयमा

घातक घनकचरा
औषधे कालबाह्य झाल्यानंतर तीन वर्षे तशीच राहिल्याने अत्यंत घातक आहेत. सरकारी वापरासाठीची ही औषधे भंगारबाजारात कशी पोहोचली, याचा तपास होईल. शास्त्रीय पद्धतीने ती नष्ट केली जातील. रवींद्र आंधळे, प्रदूषण नियंत्रण मंडळ

शासकीय औषधे
सापडलेली औषधे सलाइनमध्ये मिक्स करून दिली जातात. ती अतिदक्षता विभागातच वापरतात. त्या कंपनीची औषधे बाजारात विक्री होत नाहीत. त्यामुळे मनपा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीचाच हा साठा असावा. नितीन देवरगावकर, अध्यक्ष, केमिस्ट ड्रगिस्ट

अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ
सकाळी दहा वाजता हा प्रकार उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांना साडेचार वाजता दूरध्वनीवरून कारवाईबाबत माहिती विचारली. मात्र संबंधित अधिकार्‍यांना या प्रकाराची माहितीच नसल्याचे समोर आले.