आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारासिंग यांनी केले होते नाशिककरांचे कौतुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रख्यात कुस्तीपटू आणि अभिनेते दारासिंग यांचे गुरुवारी निधन झाल्यानंतर नाशिककरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात आलेल्या दारासिंग यांच्याशी जवळून संबंध आलेले सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी व्यक्त केलेल्या या भावना..
दारासिंग यांच्या कुस्तीविषयीच्या खास आठवणी आहेत. मुख्य कुस्तीसोबत इतर कुस्त्या मुंबईला वल्लभभाई पटेल स्टेडियमवर होत असत. त्यातीलच एक युसुफ पंजाबी या पहिलवानाबरोबरची कुस्ती तालमीतील सहकारी आणि वर्गमित्र चंद्रकांत सरपोतदार यांच्यासोबत पाहण्याची संधी मला मिळाली. दारासिंग यांची फ्रीस्टाइल त्यावेळी प्रमुख आकर्षण होते. या कुस्तीच्या निमित्ताने मी प्रथमच मुंबईत सामने पाहण्यासाठी म्हणून गेलो होतो. कुस्तीगिराचा सहकारी म्हणून कुस्ती आखाड्याजवळच प्रवेश मिळाला होता.
नाशिक महानगरपालिकेत 1992 पासून लोकप्रतिनिधींच्या कार्यास सुरुवात झाली, तेव्हा स्थायी समितीचे सभापती उत्तम कांबळे यांनी कबड्डीचे सामने भरवण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींपुढे मांडला. त्यानंतर नाशिक महापालिकेने 1992 ते 2000 पर्यंत कबड्डीसह कुस्ती, मॅरेथॉन, फुटबॉल आदी सामने भरविले. रोकडोबा तालमीचे अध्वयरू व स्थायी समितीचे तत्कालीन सभापती शाहू खैरे यांनी त्या वर्षात कुस्तीच्या सामन्यांच्या अंतिम दिवशी हिंदकेसरी पुरस्कारासाठी प्रमुख पाहुण्यांचा शोध घेताना दारासिंग यांच्या नावाचा विचार मांडला. त्यावेळी कोल्हापुरात दारासिंग यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते.
संजय चव्हाण, शाहू खैरे, वसंत जहागीरदार, काका मुळाणे आदींच्या सांगण्यावरून कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रातील मंडळींनी दारासिंग यांना नाशिकला जाण्याची गळ घातली आणि त्यांनी शुटिंग थांबवून नाशिकमधील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी होकारही दिला. त्यांच्या येण्याने त्यावेळी नाशिककरांना अमाप आनंद झाला होता. दारासिंग यांनीही नाशिककरांचे खूप कौतुक केले होते.