आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेनशे घरांवर दिसणार मुलींच्या नावाच्या पाट्या, नाशिकमधील घाेटेवाडी गावाचा अादर्श उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ यासारखी घोषवाक्ये केवळ कागदावरच न राहता ती प्रत्यक्षात उतरावीत, मुलींना स्वत:च्या घरातच सन्मान मिळावा, स्त्री भ्रूणहत्येस पायबंद घालून मुलींच्या जन्माचे वाजतगाजत स्वागत व्हावे या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील घाेटेवाडी (ता. सिन्नर) या छाेट्याशा गावातील मुख्याध्यापकासह काही शिक्षकांनी एक वेगळीच माेहीम हाती घेतली अाहे. या गावातील प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजावर त्या-त्या घरातील मुलींच्या नावाची पाटी लावण्याचा हा उपक्रम असून गावकऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अाहे.   
 
येवला तालुक्यातील महालखेडा येथील शिक्षक ज्ञानेश्वर पायमोडे यांच्या संकल्पनेतून हा सर्वात अाधी उपक्रम सुरू झाला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत घोटेवाडी येथील मुख्याध्यापक संतोष झावरे यांनी अापल्याही गावात त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले. ५ ते १४ वर्षे वयाेगटाच्या मुली ज्या घरात आहेत अशी सुमारे २०० कुटुंबे घाेटेवाडीत आहेत. शिक्षकांनी त्यांची यादी तयार करून शालेय शिक्षण समितीसह ग्रामस्थांना या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनीही प्रतिसाद दिला. शनिवारी प्राथमिक शाळेतील चाैथीच्या मुलांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे औचित्य साधून शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर निकम, सरपंच कल्पना  किशोर खामकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वैराळ आदींच्या उपस्थितीत गावातून मुलांची प्रभातफेरी काढून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा संदेश देत वाजतगाजत रॅलीही काढण्यात अाली.

स्वत:पासून प्रारंभ  
मलाही दोन मुली आहेत. त्यांच्या नावाची पाटी घरावर लावून या अभियानास बळकटी देणार आहोत. कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वत:पासून केल्यास  यशाचे प्रमाण सर्वाधिक असते.   
- कल्पना खामकर, सरपंच, घोटेवाडी  

 
बातम्या आणखी आहेत...