आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी साेडण्यात अाले असून, अाता शिल्लक पाणी शहरवासीयांना येथून पुढे नऊ महिने पुरवावे लागणार अाहे.
नाशिक - गंगापूर धरण समूहात ५८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, मराठवाड्यासाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यानंतर प्रत्यक्षात ४८०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. यात उद्योग, शेतीच्या आवर्तनासाठी जवळपास एक हजार दशलक्ष घनफूट पाणी अनिवार्य असून, अशा परिस्थितीत गंगापूर धरण समूहात जेमतेम ३८०० दशलक्ष घनफूट पाणी राहणार असून, प्रत्यक्षात १५ लाख नाशिककरांना येत्या नऊ महिन्यांत म्हणजेच जुलैपर्यंत ४६०० दशलक्ष घनफूट पाणी अपेक्षित आहे. परिणामी, सध्या एकवेळ पाणीपुरवठा होत असला तरी येत्या काही दिवसांत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पावसाने पाठ फिरविल्यामुळे महापालिकेने गेल्या महिन्यात नाशिक शहरात २० टक्के पाणीकपात लागू केली असून, सद्यस्थितीत दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. आधीच वाढते शहरीकरण, नवीन वसाहतींची निर्मिती यामुळे शहरात असमान पाणीपुरवठा वितरण होत आहे. त्यात जुन्या जलवाहिन्याही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करीत नसल्याची ओरड नगरसेवकांची आहे. पाण्यावरून आधीच शहरात असंतोष असताना आता गंगापूर धरण समूहातून एक हजार दशलक्ष घनफूट पाणी कमी झाले तर येत्या काही महिन्यांत मोठ्या पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

अशी होणार अडचण
रविवारीपाणी सोडण्यापूर्वीच्या साठ्यानुसार गंगापूर धरणात ३८९३ दशलक्ष घनफूट पाणी आहे. याव्यतिरिक्त गौतमी-गोदावरीत १००९, तर कश्यपीत ९४५ असे जवळपास ५८४७ घनफूट पाणी आहे. यात उद्योग, शेती वा अन्य पाणी आवर्तने एक हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडता ४८०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहील. मुळात नाशिक महापालिकेकडून ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत ४८०० दशलक्ष घनफूट पाण्यातून ४६०० दशलक्ष घनफूट वजा झाले तर २०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध राहील. महापालिकेला पाणी दिले तर उद्योग अन्य पाणी मागणी करणाऱ्यांची अडचण होणार आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी उन्हाळ्याच्या तोंडावर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यापर्यंत पावले उचलणे भाग पडेल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे, यातही नोव्हेंबर ते जुलै असा पाण्याचा हिशेब गृहीत आहे. मागील काही वर्षांचा विचार केला तर ऑगस्टपर्यंत पाऊस येत असल्यामुळे या निर्णायक कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी मोठ्या कपातीशिवाय पर्यायच उरणार नाही.