आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांतील ‘डेज’बंदीविरोधात विद्यार्थी आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फ्रेन्डशीप डे आणि व्हॅलेंटाइन डेच्या नावाखालीच महाविद्यालयातील डेज् बंद करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहे. मात्र दोन्ही डेज् अधिकृतरित्या शासकीय, विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये साजरे केले जात नाही. त्यामुळे या डेज्वर बंदी घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर केवळ वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये साजरे केले जाणारे विविध डेज् बंद होण्याची शक्यता वाढली आहे. या धोरणाला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.

विशेषत: महाविद्यालयांमध्ये सार्ज‍या होणर्‍या विविध डेज्निमित्त आयोजित होणार्‍या कॉकटेल आणि रेव्ह पाटर्य़ांमुळे कायद्याचे उल्लंघन होत असून, त्यावर आंकुश आणण्यासाठी थेट हे डे बंद करण्याच्या हालाचाली शासन स्तरावर सुरू आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठांकडून चौकशीचे अहवालही मागवण्यात आले आहेत. त्याचे आदेश लवकरच मिळण्याची अपेक्षा पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंपासून ते महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाही आहे. आदेशानंतर अभिप्राय किंवा निर्णय घेता येईल, असे कुलगुरुंनी सांगितले.

विद्यार्थी संघटना विरोधात
व्हॅलेंटाइन आणि फ्रेन्डशीप डे प्रत्यक्षात महाविद्यालयांत अधिकृतरित्या न होता, वैयक्तिक स्तरावरच साजरे केले जात असतील तर शासन कशी बंदी आणू शकते, असा सवाल सर्व राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. हा निर्णय केवळ महाविद्यालयांतील सांस्कृतिक उपक्रमांवरच गदा आणणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निर्णय अजून स्पष्ट नाही
शासनाकडून अद्याप आदेशच मिळाले नाहीत. त्यामुळे नेमका त्यात काय निर्णय घेण्यात आला हे स्पष्ट झाले नाही. सांस्कृतिक उपक्रमांव्यतिरिक्त व्हॅलेंटाइन किंवा फ्रेन्डशिप डे अधिकृतरित्या महाविद्यालयांमध्ये साजरेच केले जात नाहीत. त्यांची नोंदच विद्यापीठाच्या स्तरावर नाही.
-डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

शासन नियमाची प्रतीक्षा
संस्कृतीला धरून डे असल्यास ते उपक्रम साजरेच व्हायला हवेत. त्यानुसार महाविद्यालयातील सांस्कृतिक डेज् साजरे करणार. व्हॅलेंटाइन किंवा फ्रेन्डशीप डेज्ला आमचा विरोधच आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार भूमिका घेतली जाईल.
-योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख, भाविसे

मनविसेची मोहीम
बंदीच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. एकीकडे महाविद्यालयांत खुल्या निवडणुकांचा हट्ट धरला जात असताना डे बंद करणे दुटप्पीपणा आहे. डेज् हवेच आहे. त्यासाठी सर्वच महाविद्यालयांत सांक्षाकन मोहीम राबविणार आहोत. शासनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांबरोबरच त्यांच्या भावनांशी खेळू नये.
-अजिंक्य गिते, शहर उपाध्यक्ष, मनविसे

भले अटी शर्ती लावा. पण डेज् साजरे करू द्या.
>महाविद्यालयातील डेज् साजरे झालेच पाहिजेत. मात्र शासनाने ते बंद करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यामागे काही तरी कारण असणारच. केवळ सुरक्षितता हा मुद्दा असल्यास त्याची पोलिस वा इतर सुरक्षा यंत्रणेद्वारे व्यवस्था करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे अटी-शर्ती लागू करून डेज साजरे झालेच पाहिजे.
-स्वप्नील पाटील, शहराध्यक्ष, युवक काँग्रेस, नाशिक मध्य