आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘डेज्’ही साजरे करू नका; शासन घेणार लवकरच निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सर्वच महाविद्यालयांमध्ये साजरे होणारे विविध ‘डेज्’ बंद करण्याच्या निर्णयाप्रत राज्य शासन पोहोचले असून, आता केवळ अधिकृत पत्राची प्रतीक्षा पुणे विद्यापीठ आणि त्यानंतर विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आहे. शनिवारनंतर सलग दोन दिवस सुट्या आल्याने आता मंगळवारी (दि. 10) याबद्दल अधिकृत माहिती मिळणार असल्याचे प्राचार्यांकडून सांगण्यात आले.

महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे आणि सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवात विविध ‘डेज्’ साजरे केले जातात. शिवाय एखाद्या उत्कृष्ट यशाबद्दल ‘सेलिब्रेशन’ही होते. त्यास अनेकदा रेव्ह पार्टीसारखे स्वरूप येत असल्याचे कारण देत शासनाने हे ‘डेज्’ बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. उच्च तंत्र व शिक्षण विभागाने त्यासंदर्भात राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे. महाविद्यालयांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली पार्टी-संस्कृती आणि त्यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हेच मुख्य कारण आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घडत असलेल्या अपप्रकारांना पायबंद घालण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात असल्याचे आदेशात नमूद आहे.

अद्याप आदेश मिळाला नाही
अशा स्वरूपाचा निर्णय शासनाने घेतल्याचे समजते. मुंबईत तो लागू केला जात असल्याचे मी ऐकले आहे. मात्र, अद्याप असे कुठलेही आदेश विद्यापीठ किंवा शासनाकडून प्राप्त झाले नाहीत. परंतु, सोमवारी सुटी असल्याने कदाचित आज (मंगळवारी) समजण्याची किंवा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
-डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य, केटीएचएम महाविद्यालय

आज समजण्याची शक्यता
हा आदेश शासनाचा असून, त्यावर शुक्रवारी चर्चा झाली. मात्र, रविवार आणि सोमवारी गणेश चतुर्थीची सुटी आल्याने तो प्राप्त झाला किंवा महाविद्यालयांना देण्यात आला की नाही याची माहिती नाही. परंतु, तो मंगळवारी येण्याची शक्यता आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही तो प्रसिद्ध केला जाईल.
-डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू