आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Days Celebration Permission Demand In Hptc College

एचपीटीत डेज् साजरे करण्यायसाठी प्राचार्यांना घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सांस्कृतिक उपक्रमांसह सर्वच क्षेत्रात कायम पुढे असलेल्या एचपीटी-आरवायके महाविद्यालयाने यंदापासून पारंपरिक डेज् साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या पचनी न पडल्याने त्यांनी थेट प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनाच घेराव घालत डेज् साजरे करण्याची मागणी केली, शिवाय त्यावर निर्णय न झाल्यास स्वत:च ट्रॅडिशनल डेसह सर्वच डेज् साजरे करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे.

उच्च न्यायालयानेच यासंदर्भात दिलेला निर्णय राज्यातील सर्व विद्यापीठांना बंधनकारक आहे, असे असताना गोखले एज्युकेशन संस्थेच्याच एसएमआरके महिला महाविद्यालयात डेज् साजरे करण्यात आले. एकाच कॅम्पसमधील महाविद्यालयात केवळ विद्यापीठ वेगळे असल्याने तेथे डे साजरे करण्यासाठी कुठलीही अडचण येत नसताना एचपीटी आर्ट्स आणि आरवायके विज्ञान या गोखले एज्युकेशन संस्थेच्याच महाविद्यालयात त्यावर बंदी का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी थेट प्राचार्यांनाच विचारला.

व्हॅलेंटाइन आणि फ्रेंडशिप डे या दोन डेज्ला बंदी घालण्याचे प्रयत्न शासन आणि विद्यापीठ स्तरावर सुरू होते; मात्र अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे तो येण्याआधीच महाविद्यालयांनी इतरही डेज्च्या साजरे करण्यावर बंदी घालत त्यांच्याशिवाय विविध स्पर्धांचे आयोजन करत त्याचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. 26 डिसेंबरपासून त्यास सुरुवातही होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. विद्यार्थ्यांनीही कुठल्याही राजकीय संघटनेच्या हस्तक्षेपाशिवाय स्वत:च एकत्र येत थेट प्राचार्यांनाच डेज् साजरे करण्यासाठी साकडे घातले. विशेषत: मुलींनी त्यात हिरिरीने सहभागी होत मागील 70-80 वर्षांची महाविद्यालयाची परंपरा बंद न करण्याची विनंतीही केली. त्यानुसार यंदा ट्रॅडिशनल डे, मिस मॅच डे, ग्रुप डे असे विविध डेज् साजरे करण्याची मागणी केली. या वेळी जवळपास 400 ते 500 विद्यार्थी सहभागी झाले होते.

डेजला माझा विरोध नाही
डेज् साजरे करण्याला माझा विरोध नाही; मात्र आताच त्यावर विद्यापीठाचे आदेश बघून त्याबाबत मी निर्णय घेईल. विद्यापीठाच्या आदेशानुसारच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल. व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी महाविद्यालय

विद्यापीठाचे परिपत्रक नाही
डेज साजरे करण्याबाबत विद्यापीठाने कुठलेही परिपत्रक काढले नाही. शासन स्तरावर त्यावर कुठली चर्चा झाली किंवा नाही याचे कुठलेही आदेश अद्याप नाही. त्यामुळे ते साजरे करण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी महाविद्यालयांचाच आहे. पंडित शेळके, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ

डेज् हवेतच
डेज्मधून कलागुणांना त्यातून वाव मिळतो. विशेष म्हणजे बंदी घातलेले कुठलेही डेज् आम्ही साजरे करत नसून नियमित डेज्चीच मागणी करत आहोत. अन्यथा स्वतंत्र डेजही साजरे केले जातील. अनिरुद्ध सिद्धगणेश, जीएस, एचपीटी महाविद्यालय