आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी मारली बाजी, प्राचार्य झाले अखेर राजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विद्यार्थ्यांनी घातलेला घेराव आणि तीव्र विरोधापुढे नमते घेत एचपीटी-आरवायके महाविद्यालयाने पूर्वीप्रमाणेच पारंपरिक डेज् साजरे करण्याला अखेर परवानगी दिली आहे. महाविद्यालयाने डेज्ला बंदी घातल्यानंतर सोमवारी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना घेराव घातला होता.

सांस्कृतिक उपक्रमांसह सर्वच क्षेत्रांत कायम पुढे असलेल्या एचपीटी-आरवायके महाविद्यालयाने यंदापासून पारंपरिक डेज् साजरे न करण्याचा घेतलेला निर्णय पचनी न पडल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनाच घेराव घातला होता. शासन व विद्यापीठ स्तरावरून ‘व्हॅलेंटाइन’ व ‘फ्रेंडशिप डे’वर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतल्याची भूमिका प्राचार्य आणि महाविद्यालयीन प्रशासनाने मांडली होती. मात्र, अद्याप याबाबत कुठलाही निर्णय देण्यात आलेला नसताना कोणत्याही कारणावरून पारंपरिक डेज्बंद करणे हा पर्याय असू शकत नाही, असे मत विद्यार्थी मंचाने मांडले होते. त्यावर प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शासकीय परिपत्रकाचा दाखला दिला होता. या परिपत्रकाबाबतची शहानिशा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता, तशी तरतूद असल्याची माहिती शासकीय विभाग, तसेच विद्यापीठानने दिली नसल्याने, अखेर प्राचार्य सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली.

प्राचार्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच महाविद्यालयात डेज् साजरे होणार असून, केवळ ‘रेट्रो डे’ऐवजी ‘प्रोफेशनल अटायर डे’ साजरा करण्याचा निर्णय विद्यार्थी मंच आणि महाविद्यालयीन यंत्रणेच्या बैठकीत झाला. महाविद्यालयात याबाबत कोठेही नोटीस लावली जाणार नसली तरीही विद्यार्थी मंचाने मात्र विद्यार्थ्यांना 26 तारखेपासून डेज् साजरे करण्याचे आवाहन केले आहे. पूर्वीप्रमाणेच यंदाही डेज् साजरे होणार असल्याने मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता.