आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यसनमुक्तीसाठी हवा संवाद अन् निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणे हा आजार असून, तो स्वीकारल्यास त्यावर उपचार करणे शक्य होते. व्यसनापासून मुक्त होण्याची प्रवृत्ती अंतर्मनामुळे निर्माण होऊ शकते. आपल्या मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून पालकांनीही त्यांच्याशी संवाद साधत राहावे, असा सूर जागतिक अमलीपदार्थ विरोधीदिनानिमित्त गुरुवारी (दि. 26) आयोजित चर्चासत्रातून व्यक्त झाला. ‘दिव्य मराठी’ आणि लाइफ रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात हा विशेष कार्यक्रम झाला.

प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणि सपकाळ नॉलेज हबचे संचालक रवींद्र सपकाळ प्रमुख पाहुणे होते. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांनी ‘दिव्य मराठी’ची या कार्यक्रमामागील भूमिका मांडली. ज्ञानेश देशपांडे यांनी लाइफ संस्थेचा परिचय करून दिला. अमित उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यसने आणि त्यावरील उपायांसंदर्भात विचारलेल्या विविध शंकांचे मान्यवरांनी निरसन केले.
भरभरून प्रश्न अन् समर्पक उत्तरे
जागतिक अमलीपदार्थ विरोधीदिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ आणि लाइफ रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित विविध समाजघटकांतील नागरिकांनी मान्यवरांना अनेक मार्गदर्शनपर प्रश्न विचारले. यात व्यसन सुटण्यासाठी किती कालावधी लागतो, व्यसन पूर्णत: सुटू शकते का, उपचारपद्धतीवर विश्वास कसा ठेवावा, पालक आणि पाल्यांमध्ये यासंदर्भातील संबंध नेमके कशा स्वरूपाचे असावेत, कौटुंबिक स्थितीचा प्रभाव कसा उपयुक्त ठरू शकतो, अशा स्वरूपाच्या अनेक प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांना पाहुण्यांनी समर्पक उत्तरे दिली. प्रश्नोतरांच्या सत्रात विश्वनाथ बोदडे, विशाल पाटील, वृषाली अहिरराव, कौस्तुभ मेहता आदींनी सहभाग घेतला.
विद्यार्थिदशेत घ्यावी विशेष काळजी
४रात्रीच्या वेळी होणार्‍या हाणामार्‍यांचे कारण बहुतांश वेळी व्यसनच असते. नाशिकमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्याला आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. सार्वजनिक स्थळांवर मद्यपान करणार्‍यांच्या तक्रारी पोलिसांकडे करणे गरजेचे आहे. आपल्या मुलाला शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश देताना आई-वडिलांनीही त्या संस्थेची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. संबंधित संस्थांनीही आपल्या खुल्या जागांकडे लक्ष पुरवावे. कारण, विशिष्ट संस्थांमध्येच व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक असते.
कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त
अमलीपदार्थांच्या जाहिराती करणार नाही
४मी मायावी दुनियेचा एक घटक आहे. येथे चंगळवाद आणि ताणतणावांमुळे व्यसनांच्या आहारी जाणार्‍यांचे प्रमाणही मोठे आहे. पण, आजवर मी कोणतेही व्यसन केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. आजवर मी कधी कोणत्या अल्कोहोलिक पदार्थांच्या जाहिराती केल्या नाहीत आणि यापुढेही करणार नाही. व्यसनापासून मुक्त होण्याची प्रवृत्ती अंतर्मनामुळे निर्माण होऊ शकते. चांगल्या संस्कारांमुळेही मुले व्यसनापासून दूर राहतात. व्यसनाला केवळ आजार न मानता व्यक्तिमत्त्वातील दोष आहे, असे मानावे. हा दोष हटविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.
चिन्मय उदगीरकर, अभिनेता
नैतिक मूल्यांवर अभ्यासक्रम हवा
४आपला पाल्य व्यसनाच्या आहारी जाणार नाही यासाठी पालकांनी योग्य काळजी घ्यावी. मुलांना केवळ धाक न दाखविता प्रेमाने संवाद साधावा. संस्कारादेखील महत्त्वाचे ठरतात. नैतिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रम सुरू झाल्यास विद्यार्थ्यांवर निश्चितपणे आणखी चांगले संस्कार होऊ शकतात.
रवींद्र सपकाळ, संचालक, सपकाळ नॉलेज हब
प्रेम, स्वातंत्र्य व आदर ही त्रिसूत्री गरजेची
४थरकाप होणे, पाय दुखणे, तणाव निर्माण होणे, मद्यपानानंतर दादागिरी करणे, ही व्यसनी माणसांची लक्षणे आहेत. प्रेम, स्वातंत्र्य आणि आदर याद्वारे व्यसनांपासून सुटका होऊ शकते. योग्य उपचार झाल्यास प्रत्येक व्यसनी माणूस त्यातून बाहेर पडू शकतो.
नीलेश राजहंस, संचालक,
लाइफ रिहॅबिलिटेशन सेंटर

फोटो - ‘दिव्य मराठी’ आणि लाइफ रिहॅबिलिटेशन सेंटरतर्फे जागतिक अमलीपदार्थ विरोधीदिनानिमित्त गुरुवारी महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल. समवेत रवींद्र सपकाळ, अभिनेता चिन्मय उदगीरकर, नीलेश राजहंस.