आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णबधिर मुलांनी अनुभवले अंतराळ, समजून घेतली खगोलीय माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगणात गुरुवारी कर्णबधिर विद्यार्थ्यांना अंतराळातील गूढ ग्रहताऱ्यांविषयीची रहस्ये उलगडून दाखविण्यात अाली. या वेळी सांकेतिक खाणाखुणांद्वारे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने ही सारी माहिती देण्यासाठी तज्ज्ञही उपस्थित हाेते.
अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात अाला. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापाैर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेविका सुजाता डेरे, खगाेलतज्ज्ञ अविनाश शिरोडे, स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, ओमप्रकाश कुलकर्णी, डॉ. शिरीष पिंपळे हे खगोलशास्त्रप्रेमी या उपक्रमावेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या पाठपुराव्यानुसार "वंडर्स ऑफ युनिव्हर्स' हा शो माई लेले शाळेच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीस, मुंबईचे अभिजित शेटे यांनी आयोजित केला होता. इव्हान अॅण्ड सुदरलँड, यूएसए अॅस्ट्रल इन्क, यूएसए, वेदार्थ अॅनिमेशन, मुंबई आणि नेहरू तारांगण, मुंबई यांनी संयुक्तपणे हा खास शो तयार केला आहे. हा कार्यक्रम नाशिकमध्ये पहिल्यांदाच झाला. यापूर्वी असा शो केवळ मुंबई, अलाहाबाद सुरत शहरांत दाखविण्यात आला आहे. देशभरात २४ तारांगण असून, त्यात हा शो दाखविणारे नाशिक हे चौथे शहर ठरले आहे.
दरम्यान, शहरातील इतर कर्णबधिर विद्यार्थी, व्यक्ती, तसेच नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण तारांगणात १३ १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हाच विशेष शो पुन्हा आयोजित केला जाणार आहे. ज्या विद्यार्थी अथवा नागरिकांना या शोसाठी उपस्थित राहायचे असेल त्यांनी तारांगणचे शेखर गायकवाड यांच्याशी ९८२२८१९१९६ या मोबाइलवर अथवा ०२५३-२३११८८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी केले आहे.

कर्णबधिर मुलांसाठी आयोजित तारांगणातील शोप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह खगोलतज्ज्ञ उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...