आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या कबरीतला मृतदेह आजही सुस्थितीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जुन्या नाशिकमधील रसूलबाग कब्रस्तानात 1930 मध्ये बांधलेल्या कबरीत सुस्थितीतील मृतदेह सापडल्याने तो पाहण्यासाठी मुस्लिम बांधवांनी सोमवारी गर्दी केली. मृतदेह काही दिवसांतच मातीत विलीन होत असताना या देहाच्या अंगावरील कपडे जसेच्या तसे व शरीरही चांगल्या स्थितीत आढळल्याने त्याबाबत चर्चा होत आहे.

खडकाळीतील एका महिलेचा मृत्यू झाल्याने कबर खणण्याचे काम करणारे फिरोज शेख सकाळी 6 वाजेच्या सुमारास तेथे गेले. 40 वर्षांपासून न खणलेल्या कबरीत त्यांनी खोदकाम सुरू केले. कबरीवरील काही कडप्पे काढल्यानंतर त्यांना हा मृतदेह दिसला व ते बाहेर पळाले. हे वृत्त पसरताच परिसरातील नागरिकांसह रसूलबाग कब्रस्तानच्या ट्रस्टींना त्वरित बोलावून घेण्यात आले. तेव्हा ही कबर सन 1930 मध्ये बांधण्यात आल्याची बाब समोर आली. हे वृत्त कानी पडताच नागरिकांची तेथे गर्दी झाली. धर्मगुरू मौलाना इब्राहिम व मौलाना जहूर अहमद यांनी ही कबर त्वरित बंद करण्यास सांगितल्याने ती पुन्हा बंद करण्यात आली.
रसायनांचा वापर शक्य
जुन्या काळात दफन करण्यापूर्वी काही रसायनांचा वापर केला जात असे. या मृतदेहावरही असा प्रयोग केला असण्याची शक्यता आहे किंवा कबरीचे बांधकाम हवा घुसायला जागाच न सोडता केले असेल. डॉ. धनंजय कदम