आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूने नाशकात घेतला महिलेचा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी 42 वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूच्या आजाराशी झुंजताना मृत्यू झाला. सातपूर येथील एका सोसायटीत राहणार्‍या या महिलेला 15 ऑगस्ट रोजी अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
इएसआयसी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या महिलेला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ताप, सर्दी अशी आणि स्वाइन फ्लूसदृश लक्षणे असल्याने त्यांचे रक्तनमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 16 ऑगस्ट रोजी या नमुन्यांच्या अहवालात स्वाइन फ्लू असल्याचे सिध्द झाले होते. याच वॉर्डात आणखी एक रुग्ण संशयित म्हणून दाखल असून, त्याची प्रकृती मात्र उत्तम असल्याचे आरोग्याधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
मृत्यू स्वाइन फ्लूनेच - तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूकरिता वेगळा कक्ष कार्यान्वित आहे. उपचारासाठी लागणारी सर्व उपकरणे, औषधे, कर्मचारी योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही सर्व तयारीनिशी सुसज्ज आहोत, घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही. जी. आर. फडणवीस, निवासी वैद्यकीय अधिकारी
त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घ्या - पावसाळ्यातील सध्याच्या वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू झपाट्याने वाढत असतात. काम केल्यानंतर हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, सर्दी, पडसे, ताप यांसारखे आजार अंगावर काढू नये, त्वरित डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यावा. तसेच योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर स्वाइन फ्लूला प्रतिबंध करता येऊ शकतो, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.