नाशिक- कर्मचारी पेन्शन योजना 1995 च्या पेन्शनधारकांना आता
आपल्या हयातीचा दाखला आणि पुनर्
विवाह न केल्याचा दाखला द्यावा लागणार आहे. कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाकडून याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित दाखला या कार्यालयाकडे 30 नोव्हेंबर 2014 पर्यंत सादर करावा लागणार असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत पेन्शनमध्ये नुकतीच केंद्र शासनाने वाढ करून ती किमान एक हजार रुपये केली आहे. ही रक्कम अजून वाढवून मिळावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच स्पष्ट केले. काही पेन्शनधारकांनी जावडेकर यांच्याकडे याबाबत पत्राद्वारे मागणी केली असता, जावडेकरांनी याबाबत दिलेल्या लेखी उत्तरात वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने असे दाखले 3 नोव्हेंबरपर्यंत पेन्शनधारक ज्या बँकेतून पेन्शन घेत असेल तेथून भविष्य निधी कार्यालयाकडे दाखले पाठविण्याचे आवाहन केले आहे. या दाखल्यात पेन्शनधारकाचा
मोबाइल क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पी.पी.ओ. क्रमांक अचूक नमूद करण्याचे आवाहन भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या नाशिक विभागाचे आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.
विभागात एक लाख पेन्शनधारक
भविष्य निर्वाह निधीच्या नाशिक विभागीय कार्यालयाद्वारा विभागातील एक लाख पेन्शनधारकांच्या पेन्शनची पूर्तता केली जाते. या कार्यालयांतर्गत भविष्य निर्वाह निधीचे विभागातील एकूण 13.15 लाख सभासद असल्याची माहिती भविष्य निधीच्या नाशिक विभागाचे आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली.