आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलाॅन मांजाने घटली पक्ष्यांची संख्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील झाडे, खांब अाणि इमारती यावर माेठ्या प्रमाणात अडकलेल्या नायलाॅन मांजाचे जाळे निर्माण झाले असून, त्यामुळे असंख्य पक्षी मृत्युमुखी पडल्याचा निष्कर्ष नेचर क्लब अाॅफ नाशिकच्या पक्षी गणनेतून निघाला आहे. नायलाॅन मांजामुळे शहरातील पक्ष्यांची संख्याही घटल्याचे विदारक वास्तव या पाहणीतून पुढे अाले अाहे.
नाशिककरांना पक्ष्यांची ओळख व्हावी, पक्ष्यांची आजची स्थिती, प्रदूषणाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम, नायलॉन मांजाचा परिणाम, बदलती पक्ष्यांची घरटी अभ्यासण्यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे ‘चला, पक्षी मोजू या’ या उपक्रमांतर्गत शहरातील पक्षी गणना करण्यात आली. गेले आठ दिवस पक्षीमित्र विविध नगरे, धरणे, गोदा पार्क, उद्याने येथे पाहणी करून टिपणेदेखील घेण्याचा प्रयत्न करीत हाेते. नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे दरवर्षी गणना करण्यात येते. या पाहणीदरम्यान अनेक पक्षी झाडांवरील अाणि खांबांवरील नायलाॅन मांजात अडकून मृत्युमुखी पडल्याची बाब अाढळून अाली. पक्षी निरीक्षण करताना शहरातील सर्वच झाडांवर नायलाॅन मांजा लटकलेला दिसून अाला. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. अानंद बाेरा, पक्षीमित्र उमेशकुमार नागरे, भीमराव राजाेळे, अाशिष बनकर, दर्शन घुगे, अाकाश जाधव, अमाेल उबाळे, अर्चना साेनवणे, प्रियंका काठे, तनुजा पवार, रमेश वैद्य, सागर बनकर, रिद्धी साेनवणे, गणेश जाधव, धनंजय बागड, सलाेनी वाघमारे सहभागी झाले हाेते.

नाशकात गवतात पाण्यावर राहणाऱ्या पक्ष्यांच्या ५० प्रजाती : नाशिकस्मशानभूमी, रामकुंड, गोदा पार्क, घारपुरे घाट, केटीएचएम कॉलेज बोट क्लब, आनंदवली, गंगापूर धरण, तपोवन या ठिकाणी पक्षीगणना करण्यात आली. या एका दिवसात गवतात आणि पाण्यावर राहणाऱ्या ५० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. नाशिक स्मशानभूमी परिसरात २५ प्रजातींचे पक्षी दिसले. याच परिसरात आठ-दहा प्रकारचे पाणपक्षी बघावयास मिळाले.

मांडाव्यात व्यथा
जीवघेण्या नायलाॅनच्या मांजामुळे नाशिककर जखमी होण्याचे प्रकार अलीकडे घडत आहेत. या मांजाबाबत अापलाही कटू अनुभव असल्यास ताे फाेटाेसह ९९७५५४७६१६ किंवा ९८२२११४४३८ या व्हाॅट्सअॅप क्रमांकांवर शेअर करावा. निवडक अनुभवांना ‘दिव्य मराठी’त प्रसिद्धी दिली जाईल. नायलाॅन मांजाविरोधात जनजागृतीपर उपक्रम राबवित असल्यास त्यालाही योग्य ती प्रसिद्धी दिली जाईल.

मांजात अडकून पक्ष्यांचा मृत्यू
^गाेदापार्क परिसरात एक कावळा वटवाघूळ मांजात लटकून मरण पावले हाेते. या मांजाचा फटका गव्हाणी, घुबड, घार, कावळे या पक्ष्यांना बसल्याचे निरीक्षण नाेंदविण्यात अाले अाहे. अानंद बाेरा, अध्यक्ष,नेचर क्लब अाॅफ नाशिक