आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंचूरला दरोडेखोरांनी लुटले साडेदहा तोळे सोने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- विंचूरमधील आकाशनगर येथील ‘सयश’ बंगल्यावर सोमवारी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत सुमारे साडेदहा तोळे सोने व चांदीचे दागिने लुटले.

लक्ष्मीकांत यशवंत कुलकर्णी यांचा हा बंगला असून, ते पत्नी, वडील व मुलगा यांच्यासमवेत झोपलेले असताना, दरोडेखोरांनी बंगल्याचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कुलकर्णी यांच्या पत्नीला तलवारीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दागिन्यांची मागणी केली. बाजूला असलेल्या कुलकर्णी यांच्या वडिलांच्या कपाळावर दरोडेखोरांनी काठीने जोरदार प्रहार केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साडेदहा तोळे सोने, चांदीचे निरांजन, पंचपात्री आदी साहित्य काढून दिले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील चार मोबाइल घेऊन पोबारा केला. हे चारही दरोडेखोर अंदाजे पंचवीस वर्षे वयाचे होते. त्यांच्याकडे तीन तलवारी होत्या व ते मराठी भाषेत बोलत होते.

दोघांनी तोंड कपड्याने बांधलेले होते. दरोडेखोर पळाल्यानंतर कुलकर्णी कुटुंबीयांनी घराबाहेर येत शेजारच्यांच्या मदतीने विंचूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लासलगावचे पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक शीतल पाटील, निफाडचे पोलिस निरीक्षक बी. टी. बारवकर, पिंपळगाव बसवंतचे पोलिस निरीक्षक शेळके, ओझरचे वाघ यांनी परिस्थितीची पाहणी करून तपास सुरू केला. नाशिकचे पोलिस उपअधीक्षक व्ही. एम. देशमाने व निफाडचे पोलिस उपअधीक्षक संदीप आटोळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. जखमी यशवंत कुलकर्णी यांना निफाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.