आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीच्या परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेची अर्धा तास प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - येथील बिटको महाविद्यालयात मंगळवारी विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षाची पदवी परीक्षा दुपारी 2.30 वाजता सुरू झाली. मात्र, परीक्षार्थींना अर्धा तास प्रश्नपत्रिकेची वाट पाहावी लागली. प्रश्नपत्रिका मिळण्यास वेळ होऊ लागल्याने गोंधळ सुरू झाला. यामुळे हा प्रकार उघडकीस आला. अखेर दुपारी 3 वाजता प्रश्नपत्रिका परीक्षार्थींच्या हाती पडली. या गोंधळामुळे परीक्षार्थींना मानसिक त्रास झाला.

पुणे विद्यापीठाकडून एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेस सोमवारी प्रारंभ झाला. त्यानुसार, विज्ञान शाखेतील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचा रसायनशास्त्र, तर विज्ञान कॉम्प्युटर शाखेचा सिस्टम प्रोग्रामिंग अँण्ड ऑपरेटींग सिस्टम या विषयाची परीक्षा होती. प्रत्येकी 24 विद्यार्थी नवीन इमारतीतील ब्लॉक नंबर 21 मध्ये 2.30 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित होते. मात्र, प्रश्नपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली.

अर्धा तास वेळ वाढवून दिला : परीक्षा नियंत्रकांनी दुपारी 2 वाजता प्रश्नपत्रिका पाठवूनदेखील त्याचे वाटप ठरलेल्या वेळी झाले नाही. दोन प्रश्नपत्रिकांचे एकच पाकीट वर्गात पोहचवल्याचे संबंधित शिपायाने सांगितले. बिटको महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र त्याबाबत इन्कार करत उशिर झाल्याची वेगवेगळी कारणे दिली. परंतु परीक्षा दालनात प्रश्नपत्रिका 3 वाजता वाटप करतेवेळी ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे सांगितल्यावर, यापुढे काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले. प्रश्नपत्रिकेस अर्धा तास उशीर झाल्याने परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून देण्यात आला. त्यानुसार 4.30 ऐवजी 5 वाजता उत्तरपत्रिका स्वीकारण्यात आल्या.

अर्धा तास उशीर झाला तर काय झाले?
के. के. वाघ महाविद्यालयात 9.30 वाजता प्रश्नपत्रिकांचे वाटप झाले होते. येथे फक्त अर्धा तासच उशीर झाला तर काय झाले? विद्यापीठाकडून जेव्हा प्रश्नपत्रिका येतील तेव्हाच वाटप केल्या जातील. - दिनेश म्हात्रे, प्राध्यापक

प्रश्नपत्रिका वेळेत
परीक्षेसाठीच्या सुपरवायझरकडे वेळेत प्रश्नपत्रिकेचा संच दिला होता. वेळेत वाटप करण्याची जबाबदारी त्यांची होती. डॉ. डी. जी. शिंपी, परीक्षा नियंत्रक

असे झाले नाही
विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. उशीर झाला असेल तर यापुढे असा गोंधळ होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य