आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनास्था, पावसाळापूर्व गटार सफाई रखडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दरवर्षी पहिल्या पावसात शहरातील खोलगट भागातील घरे, दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याचा अनुभव असूनदेखील यंदाही महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व गटार चेंबरच्या सफाईला सुरुवात केलेली नाही. जून महिना उजाडल्यानंतरही संबंधित कामाचा ठेका देण्यासाठी निविदेची प्रक्रिया सुरू असल्यामुळे यंदा नागरिकांना पावसाच्या पाण्याच्या संभाव्य आपत्तीचा सामना करावा लागेल, असे चित्र आहे.
साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हाेणाऱ्या पावसामुळे दरवर्षी नाशिककरांची तारांबळ उडत असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून रस्ते, लगतचे नाले, भूमिगत गटार योजना, नदी, नाल्यांवरील पूल, तसेच खोलगट भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक डागडुजी केली जात असते. बहुतांश ठिकाणी चेंबर्सची छिद्रे माती, सिमेंट वा वाळूने भरलेली असतात. त्यांची सफाई करून पावसाचे पाणी भूमिगत गटारीत जाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते. दरवर्षी या कामांना पावसाळ्यात सुरुवात हाेत असल्यामुळे पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. यंदाही अशीच परिस्थिती असून, जून महिना उजाडल्यानंतरही पावसाळापूर्व दुरुस्ती वा देखभालीच्या कामांना सुरुवात झालेली नाही.
यासंदर्भात बांधकाम विभागातील सूत्रांशी संपर्क साधला असता, त्यांनी निधी कोणत्या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करायचा, असा प्रश्न असल्याचे सांगितले. तूर्तास सहाही विभागांतील महत्त्वाच्या कामांची यादी तयार झाली असून, जूनपर्यंत निविदा अंतिम करून कामे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या कामासाठी ७० ते ८० लाख रुपयांचा निधी लागणार असून, निधीची अडचण असल्यामुळे काही ठिकाणी गटार दुरुस्ती योजनेतूही कामे सुरू केली जात असल्याचे सांगण्यात आले. तूर्तास महापालिकेच्या यंत्रणेमार्फत मोठे पूल महत्त्वाच्या रस्त्यांवरील चेंबर्स माेकळे करण्याची कामे सुरू झाली आहेत.
मोठ्या नाल्यांची रोबोटने सफाई
वाघाडी नाल्याच्या सफाईचे काम सध्या रोबोटद्वारे सुरू असून, पाठोपाठ नासर्डीचीही सफाई केली जाणार आहे. राेबाेटच्या वापरामुळे झटपट सफाई होत असल्याचे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
येथे तुंबते नेहमीच पाणी
महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोरील रस्त्यावर, अशोक स्तंभाकडून घारपुरे घाटाकडे, जुना गंगापूर नाका, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, त्र्यंबक नाका, शालिमार, मालेगाव स्टॅण्ड, भद्रकाली, फाळके रोड आदी परिसरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पाणी तुंबत असल्याचा पूर्वानुभव आहे.