आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र मंत्रालयासाठी अनोखे आंदोलन; पारंपरिक पोषाखात मागण्या पूर्ततेसाठी घोषणाबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशात 17 कोटी, तर राज्यात अडीच कोटीच्या आसपास असलेल्या भटक्या-विमुक्तांना घटनेप्रमाणे अधिकार मिळावा व त्यांचा विकास होण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, या मागणीसह विविध 24 मागण्यांसाठी पारंपरिक वेश परिधान करत भटके विमुक्त समाज विकास परिषदेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
वासुदेव, कोळी, पोतराज अशा पारंपरिक व्यवसायाशी संबंधित पेहराव करून, टिकाव-फावड्यांसह भटक्या-विमुक्त जातींच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणा देत प्रवेश केला. यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. दुपारी जिल्हाधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या शासनाकडे तातडीने पाठवत त्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष रतन सांगळे, भीमा काळे, मांगूलाल जाधव, सोमनाथ मोहिते, बापू शिंदे, प्रकाश जाधव, गोपी क्षत्रिय, गिरिजा चोथे, योगेश बर्वे या प्रमुख कार्यकर्त्यांसह विविध समाजातील बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
राज्याच्या अर्थसंकल्पात भटक्यांना 10 टक्के तरतूद करावी.
भटके विमुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 11 टक्के आरक्षण द्यावे.
शिक्षणात शुल्क प्रतिपूर्ती योजना, संशोधनासाठी सवलती व एस. सी., एस. टी.च्या प्रमाणात शिष्यवृत्ती द्यावी.
भटक्या समाजाच्या पालांवर जाऊन तपासणी करून रेशनकार्ड आणि जातीचे प्रमाणपत्र द्यावे.
भटके विमुक्त समाजात बहुसंख्य कलाकार आहेत. त्यांना दरमहा 3000 रुपये मानधन द्यावे.
यासह विविध 24 मागण्या यावेळी करण्यात आल्या.