आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अाता अपयशी पालिका प्रशासनालाही ‘ताप’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशभरात डेंग्यू, चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला असून, या गंभीर अाजारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासूनही नाशिक शहराचा विचार केला तर सातपूर, इंदिरानगर, सिडको, जुने नाशिक परिसरातही डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शहरातही पाॅझिटिव्ह रुग्ण अाणि त्यात मृत्यू झालेल्यांचा अाकडा थक्क करणारा अाहे. असे असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र जनजागृती वा तपासणी पलीकडे कुठलीही ठाेस उपाययाेजना केली जात नसल्याचेच ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभाग वैद्यकीय विभागाने तातडीने विशेष कृती कार्यक्रम राबवण्याची, तसेच प्रभावी उपाययाेजना करण्याची गरज असताना, अद्यापही शहरातील अनेक डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात अालेली नाही. ऑगस्ट महिन्यात नाशिक शहरात ४०३ संशयित रुग्ण आढळले होते, त्यापैकी १८७ रुग्णांचे नमुने पाॅझिटिव्ह अाल्याने खुद्द अाराेग्यमंत्री सावंत यांनीही धसका घेतला हाेता. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले हाेते. परंतु, तरीदेखील पालिका प्रशासनाने याेग्य प्रतिबंधात्मक उपाय केल्याने सप्टेंबर महिन्यातही २० तारखेपर्यंत ४०० संशियत रुग्ण आढळले अाहेत. त्यापैकी ४३ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून, पालिकेच्या अाराेग्य विभागाचे अपयश पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवत अाहे.

चिकनगुनियाची लक्षणे अशी...
ताप,हुडहुडी भरणे, डोके दुखणे, मळमळ होणे, वांती हाेणे, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ येते. या आजारात वाक येणे किंवा कमरेतून वाकलेला रुग्ण हे लक्षणे अधिक दिसतात. नेहमी सतत राहणारी सांधेदुखी. त्याकरिता दीर्घकाळ वेदनाशामक उपचारांची गरजही भासू शकते.

या उपाययोजना हाेणे गरजेचे...
{घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामी करून स्वच्छ करावी.
{ पाणी साठविण्याची सर्व भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवावी.
{ घराच्या सभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ कोरडा ठेवावा.
{ निरुपयोगी टाकाऊ वस्तू घराच्या छतावर आणि परिसरात ठेवू नये. त्यांची याेग्य विल्हेवाट लावावी.
{ बंद दुकाने, गाळे वा खाेल्यांची नियमितपणे स्वच्छता करावी.
{ डासांपासून बचावासाठी शक्यतो पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत.

धूरफवारणीचा उपयाेग काय?
शहरात वाढत्या साथीच्या अाजारांसह डेंग्यूच्या फैलावामुळे महापालिका प्रशासनाकडून धूरफवारणीचा पर्याय अवलंबला जात अाहे. विशेष म्हणजे सकाळच्या सुमारास धूरफवारणी हाेत असल्याचे सांगण्यात अाले. या धूरफवारणीचा डासांवर कितपत परिणाम हाेत असेल, याचा विचार प्रशासनाने करायला हवा. प्रत्यक्षात धूर फवारण्यापेक्षा अाैषध फवारणी हाेऊन पूर्णत: परिसर स्वच्छता हाेणे अधिक परिणामकारक ठरू शकेल. अनेक तज्ज्ञांनीदेखील ‘डी. बी. स्टार’कडे याबाबत प्रतिक्रिया दिल्या असून, धूरफवारणीवर हाेणारा खर्च टाळून अाैषध फवारणी व्हावी, अशी अपेक्षादेखील त्यांनी ‘डी. बी. स्टार’च्या माध्यमातून व्यक्त केली अाहे.

अाश्वासनांच्या पूर्ततेचा विसर
अाराेग्यमंत्र्यांनी अादेश दिल्यावर घरभेटीत तापाचे रुग्ण तपासून संशयास्पद रुणांचे रक्तनमुने तपासले जातील. परिसरातील साचलेल्या पाण्याची ठिकाणे, तसेच डासांच्या अळ्या नष्ट केल्या जातील, आरोग्य पत्रकांचेही नियमितपणे सर्वत्र वाटप केले जाईल, नवीन बांधकामे, टायर दुरुस्तीची दुकाने, तसेच भंगार दुकानांचीही तपासणी केली जाणार असून, डेंग्यूबाधित भागात घरांमध्येही जंतुनाशक धूरफवारणी केली जाईल, अशी अाश्वासने पालिकेच्या अाराेग्य विभागाकडून देण्यात अाली हाेती. मात्र, तीन दिवस उलटूनही अद्यापपर्यंत प्रत्यक्ष कृतीचा संबंधित अधिकाऱ्यांना विसरच पडला अाहे. परिणामी, ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत अनेक ठिकाणी अाराेग्याला बाधक चित्रच दिसून अाले.

नाशकातील ११ अाराेग्य केंद्र अतिसंवेदनशील
ऑगस्टमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक १८७ रुग्ण आढळून आले असून, पालिका क्षेत्रातील ३० पैकी ११ शहरी अाराेग्य सेवा केंद्रांतच ११४ डेंग्यूबाधित रुग्ण अाढळल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. त्यामुळे अाराेग्य केंद्रच अतिसंवेदनशील ठरले अाहेत. त्यात सातपूर विभागातील महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, संजीवनगर, गंगापूर, सिडकाे, पवननगर, मोरवाडी, कामटवाडे, नाशिक पूर्वत वडाळागाव, भारतनगर, नाशिकरोड, नाशिक पश्चिम विभागात सिव्हिल हाॅस्पिटलमधील केंद्राचाही समावेश आहे.

भंगारातील वाहने, टायर्स अाणि बांधकाम ठिकाणी वाढली डासांची उत्पत्ती...
शहरात डेंग्यूचे संशयित अाणि पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने द्वारका, पंचवटी, अाडगाव नाका, गंजमाळ, शिंगाडा तलाव परिसर, मुंबई नाका यांसह सिडकाे, सातपूर, जुने नाशिक परिसरात पाहणी केली. या पाहणीत अनेक ठिकाणी भंगार वाहने, टायर्स, अडगळीत पडलेला कचरा, पाण्याची डबकी असे चित्र दिसून अाले. विशेष म्हणजे, अनेेक वर्षांपासून बंद पडून असलेल्या अास्थापना, तळमजल्यावरील बंद दुकाने, तसेच बांधकाम सुरू असलेल्या अथवा बंद पडलेल्या ठिकाणी डासांच्या उत्पत्तीची सर्वाधिक स्थळे अाढळून अाली. याकडे संबंधित अास्थापनांचे मालक, परिसरातील रहिवाशी अथवा दुकानमालक, गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक, संबंधित जागामालक यांच्यासह महापालिकेच्या अाराेग्य विभागाकडून पूर्णत: दुर्लक्षच हाेत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले. सिडकाे, सातपूर, जुने नाशिक परिसरात हे चित्र प्रकर्षानेे दिसून अाले.

डेंग्यूची उत्पत्ती स्थाने त्वरित नष्ट करावीत
^डेंग्यूचे वाढते रुग्ण अाणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून तातडीने डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट करायला हवीत. -सचिन मराठे, नगरसेवक

विशेष कृती कार्यक्रम राबवण्याची गरज
शहरात वाढता डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून केवळ धूरफवारणीचा केविलवाणा प्रयत्न केला जाताे. वाढत्या डेंग्यू रुग्णसंख्येमुळे खुद्द अाराेग्यमंत्री सावंत यांनी विशेष कृती कार्यक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली तशा सूचनाही दिल्या असताना, अद्यापही पालिकेकडून त्यादृष्टीने ठाेस पावले उचलली गेली नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर येत अाहे.

अशी आहेत डेंग्यूची लक्षणे...
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप, सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक वाढते, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या त्याचबराेबर त्वचेवर व्रण उठणे अादी लक्षणे दिसतात.
गेल्या दाेन महिन्यांत डेंग्यूच्या संशयित तथा रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली असताना, महापालिका प्रशासन मात्र अद्यापही तपासणी अाणि सर्व्हे करण्यातच धन्यता मानत अाहे. प्रत्यक्षात अाराेग्यमंत्र्यांनी या समस्येबाबत गंभीर दखल घेत तातडीने विशेष कृती कार्यक्रम राबवण्याचे अादेश दिले असतानाही तसे हाेताना दिसून येत नाही. परिणामी, सप्टेंबर महिन्यात अातापर्यंत डेंग्यूचे ४०० हून अधिक संशयित अाढळले अाहेत. या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ने शहरात पाहणी केली असता डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने अद्यापही नष्ट केली नसल्याचे दिसून अाले. नागरिकांच्या अाराेग्याप्रति उदासीन पालिकेच्या कारभारावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
विजय डेकाटे, आरोग्याधिकारी,महापालिका प्रशासन
{ शहरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून काय ठाेस उपाययोजना करण्यात येत आहेत?
-डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरात घरोघरी जाऊन तपासणी केली जात अाहे. तसेच, विशेष सर्व्हेही सुरू आहे.
{कोणत्या भागात रुग्णांची संख्या अधिक अाढळली?
-शहरातील सातपूर, सिडको वडाळा गाव या भागात डेंग्यूच्या रुग्णांची वा संशयितांची संख्या अधिक आढळली अाहे. संबंधित परिसरात लवकरच त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
{डेंग्यू प्रतिबंधासाठी शहरातील बंद तळघरे, बंद बांधकाम ठिकाणे, भंगार वाहने, टायर्स असलेली ठिकाणे वा ब्लॅक स्पाॅट‌्स अादी ठिकाणी पाहणी करणे गरजेचे वाटत नाही का?
-नागरिकांमध्ये जनजागृती, औषध फवारणी, स्वच्छता मोहीम राबवताे अाहे. तसेच, डेंग्यूचे उत्पत्ती स्थानेही नष्ट करण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...