आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्‍टोबरमध्ये डेंग्यूची शंभरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ऑक्‍टोबर महिन्यात डेंग्यूने शंभरी गाठली असून, महिन्यातील तीस दिवसांचा विचार केल्यास दिवसाला तीन रुग्ण अशी सरासरी असल्यामुळे डेंग्यू आजाराची तीव्रता शहरात वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर महापौर अशोक मुर्तडक यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत आरोग्‍य वैद्यकीय विभागाच्या अधिका-यांची कानउघडणी करीत, तात्काळ जनजागृती उपाययोजनेचे आदेश दिले.
गेल्या दोन महिन्यांत शहरात डेंग्यूने डोके वर काढले असून, ऑक्‍टोबरमध्ये 218 संशयित रुग्ण तपासण्यात आले. नोव्हेंबरच्या चार दिवसांत 35 संशयित रुग्ण आढळले असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. डेंग्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आहेर यांनी महापौरांना फोन करून बैठक बोलवण्याची सूचना केली. त्यानुसार ‘रामायण’ या महापौरांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांच्यासह पदाधिकारीही होते. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता आणि प्रत्येक सोसायटीत डेंग्यूबाबत जनजागृती करण्याचेही आदेश महापौरांनी दिला.
गेल्यावर्षीपेक्षाही गंभीर स्थिती :गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 50 रुग्ण होते. यंदा मात्र 58 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ऑक्‍टोंबर महिन्यात 58 रुग्ण होते. यंदा मात्र ऑक्‍टोबरमध्येच 100 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट रुग्ण असून यावरून डेंग्यूची तीव्रता लक्षात येते.