आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संदर्भ’मधील लिफ्टमध्येही तांत्रिक बिघाड, रुग्णांचा जीव धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात असलेली काही महत्त्वाची यंत्रणा देखभालीअभावी बंद असल्याचे समोर आल्यानंतर रुग्णालयात असलेल्या लिफ्टची माहिती घेतली असताना रुग्णालयात असलेल्या चारपैकी दोन लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याची बाब समाेर आली आहे. तर अनेकवेळा गंभीर रुग्णांना लिफ्टद्वारे वरच्या मजल्यावर घेऊन जातानाच लिफ्ट बंद पडत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे करण्यात आल्या अाहेत.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातूनही औषधोपचारासाठी रुग्ण येतात. नाशिकसह खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांतील गोरगरिबांची संदर्भ सेवा रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ संदर्भ सेवा रुग्णालयाने रुग्णांना प्राप्त करून दिला आहे. मात्र, या रुग्णालयातील अनेक यंत्रणांमध्ये सध्या तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णालयातील एसी बंद असल्याची बाब समोर आल्यानंतर गेल्या वर्षांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या लिफ्टकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची बाब समोर आली आहे.

रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी रुग्णालयात लावण्यात अालेल्या लिफ्टची दुरुस्तीच केली जात नसल्याने या लिफ्टमध्ये मोठा अावाज येत असून, ती मध्येच कधीही अचानक बंद पडत असल्याच्या तक्रारी अाहेत. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी येथील कर्मचारी रुग्णाला व्हीलचेअरवरून जिन्यापर्यंत घेऊन जातो. मात्र, लिफ्ट बंद असल्याने रुग्णाला पायऱ्या चढून वर जावे लागते. अशावेळी नातेवाइक रुग्णाला उचलून नेतात. परंतु मोठ्या अाजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अशावेळी फार हाल होतात. रुग्णालयातील या लिफ्टची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लिफ्टमध्ये प्रमाणपत्र नाही
संदर्भ सेवा रुग्णालयातील चारपैकी दाेन लिफ्ट खराब अाहेत. अनेकवेळा कोणत्याही मजल्यावर या लिफ्ट बंद पडतात. रुग्णालयातील एकाही लिफ्टमध्ये ‘लिफ्ट सुरू अाहे की बंद’ याचे प्रमाणपत्र लावलेले नाही. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लिफ्ट सुरू अाहे
^संदर्भसेवा रुग्णालयात असलेल्या चारही लिफ्ट सुरू अाहे. या लिफ्टच्या दुरुस्तीची कामे अधूनमधून केली जातात. अनेकवेळा देखभालीसाठी निधी नसल्याने अडचणही येते. - एम. पी. हुपळे, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग (इलेक्ट्रिकल)