आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांचा सेवाभाव उरला केवळ शपथ घेण्यापुरताच - देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ हा आनंद देणारा क्षण असतो. देशाच्या व समाजाच्या सेवेमध्ये आपण एक नवी पिढी दाखल करत असतो. इतर विद्यापीठांतील पदव्यांच्या तुलनेत वैद्यकीय क्षेत्रातील पदवीमध्ये मूलभूत फरक असतो. ही पदवी घेताना मूल्य आणि तत्त्व या भावनेतून काम करण्याची प्रतिज्ञा दिली जाते. त्यानंतर एक महत्त्वाची जबाबदारी येत असते. मात्र, दुर्दैवाने ही प्रतिज्ञा फक्त समारंभापुरती उरली असून त्याचे नंतर पालन होत नाही. व्यावसायिकीकरणामुळे डाॅक्टरांमधील सेवाभाव संपत चालला आहे’, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात ते बाेलत हाेते. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलपती विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. अरुण जामकर, प्रति-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आराेग्य विद्यापीठाच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या ७१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.
संशाेधनातून उपाय शाेधा
जग वार्धक्याकडे झुकत असताना दुसरीकडे तरुणांचा देश म्हणून आपला देश भारताचा उदय होत आहे. महासत्ता होण्याचे ध्येय साध्य करायचे असेल तर आरोग्य आणि बुद्धीच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ग्रामीण भागातील ४० टक्के लाेक अद्यापही मागास असून कुपोषणासह आरोग्याच्या समस्या तीव्र आहे. समाजातील या समस्या व कमतरता लक्षात घेऊन त्यावर संशोधनातून उपाय शोधण्याची गरज आहे. मात्र, संशोधनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. विद्यापीठे ही संशोधनाची केंद्रे असून परिवर्तन हे विद्यापीठांमधूनच होत असते. त्यामुळे संशोधनाला अधिक चालना देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बोगस डॉक्टर शाेधणार
अधिकृत शिक्षण व पदवी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या व्यवसाय करणार्‍या बोगस डॉक्टरांचा शोध घेतला जाईल. यासंदर्भात राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, तसेच बोगस डॉक्टरांविरोधातील कायद्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. तर आरोग्य क्षेत्रापुढे भविष्यात आव्हाने उभी ठाकणार असल्याने संशोधनाच्या माध्यमातून या आव्हानांवर मात करण्याचे आवाहन तावडे यांनी केले. त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

तीन लाख कोटींचे कर्ज, तरीही पैसा देणार
महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर असल्याचे वास्तव मांडताना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, ‘जेब मे फुटी काैडी नही, लेकिन पॉंच लाख का सौदा करने आया हूंॅ’ असे सांगत विद्यापीठाला सर्वतोपरी आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज असले तरी परीक्षा केंद्राच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अधिकार्‍यांना केआरए लावणार
राज्य शासनाने विकासाचे व्हिजन समोर ठेवले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांना टार्गेट देऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी शासकीय अधिकार्‍यांना ‘केआरए’ (की रिझल्ट एरियाज) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाच्या कामाचे ‘केआरए’नुसारच मूल्यमापन केले जाणार आहे. राज्य शासनाने घेतलेले निर्णय आणि प्रत्यक्षात त्याबाबत झालेली अंमलबजावणी यासाठी या ‘केआरए’ पद्धतीचा फायदा होईल. अधिकार्‍यांना विश्वासात घेऊन टार्गेट दिली असून केआरएबाबत भविष्यात सुधारणा केल्या जातील, असेही फडणवीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...