आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेसाठी युतीतील जागांमध्ये होणार बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भाजप-शिवसेना युती लोकसभा निवडणुकीला अभेद्य राहूनच सामोरी जाणार आहे. त्यासाठी युतीचे जागावाटपही निश्चित आहे; परंतु काही जागांवर मात्र स्थानिक परिस्थितीनुसार अदलाबदल होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

नाशिकच्या दौर्‍यावर आलेल्या फडणवीस यांनी ‘वसंतस्मृती’ पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. महायुतीबाबत ते म्हणाले,ज्या राजकीय पक्षांना कॉँग्रेस नको असेल, त्यांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनसेचाही युतीचा विचार पुढे आला होता. मात्र, कोणाचीही वाट बघत बसणार नसून जे आले त्यांच्याबरोबर-जे आले नाहीत, त्यांच्याशिवाय निवडणूक लढण्याची तयारी आहे. राज्यात शिवसेना-भाजप-रिपाइंची युती अभेद्य असून, लोकसभा निवडणुकीसाठी गेल्यावेळेप्रमाणेच भाजप 26, शिवसेना 22 असे समीकरण ठरले आहे. यात, काही ठिकाणी आमची ताकद वाढली तर काही ठिकाणी सेनेची, त्याप्रमाणे जागा वाटपात काही जागांवर बदल होऊ शकतो. राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर काल मुंबईत झालेल्या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. मोदी ‘वाघ’ असून, त्यांना बघूनच कॉँग्रेसवाल्यांना कापरे फुटते. त्यातूनच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नाव भ्रष्टवादी पक्ष ठेवले पाहिजे. यावर अंकुश ठेवण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हतबल ठरले आहेत. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची मागणी केली असता त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाची दिशाभूल केली.

पेशव्यांप्रमाणेच त्यांनी ध चा मा केला. एसआयटीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात स्पेशल इनक्वायरी टीम (विशेष चौकशी पथक) नियुक्ती केली. आदर्श घोटाळ्यातही दोन्ही-तीनही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केले असताना त्यांना निदरेष ठरवून केवळ अधिकार्‍यांवरच कारवाईचा प्रस्ताव आहे. काही मंत्र्यांनी आपल्याजवळच्या माणसांच्या नावे खाते उघडून फ्लॅट खरेदी केलेले आहेत. सीबीआयच्या चौकशीतच ते उघड होऊ शकते. सीबीआयने ते केले नाही तर भाजप त्यांची लवकरच नावे उघड करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. विविध मुद्यांवर मत व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्य सरकारकडून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे स्वप्न दाखवून त्याद्वारेच गेल्या दोन निवडणुका जिंकल्यात. मात्र, गुजरातमध्ये एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा ऐतिहासिक पुतळा समुद्रात उभारला जात असून, त्यासाठी महाराष्ट्रातील 41 हजार गावांतून शेतकर्‍यांकडून लोखंड जमा करण्यात येत आहे.

मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालातील सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मंत्रालयाला आग लागल्याचे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेसाठी आठ कोटी रुपये खर्च केल्याचे विधान तोडून मोडून प्रसिद्ध केले जात आहे. पूर्ण भाषणात त्यांचा आशय वेगळा होता. तरीही कोणी चौकशीची मागणी करीत असल्यास अशा चौकशीला ते सामोरे जातील. पोतुर्गाल सरकारकडून करारावर आणलेल्या कुविख्यात गुन्हेगार अबू सालेम याच्यावर तुरुंगात जाऊन झालेल्या हल्ल्यावरून कायदा व सुव्यवस्थेचे चित्र दिसून येते. प्रत्येक हल्ल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडून तुरुंगाची सुरक्षा मजबूत केली जाणार असल्याचे सांगितले जाते, यावरून त्यांनी आता गृहमंत्रालय सोडून प्रवचनकार बाबा झाले पाहिजे.