नाशिक - थंड हवेचे ठिकाण अशी देवळाली परिसराची ओळख आता धूसर होताना दिसून येत आहे. आल्हाददायक हवामानामुळे लष्करी जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी आर्टिलरी स्कूल सेंटर, चलनी नोटा तयार करण्यासाठी अनुकूल हवामान असल्याने करन्सी नोट प्रेस आदी आस्थापनांची येथे निर्मिती झाली.
वृक्षांची मांदियाळी आणि शांत-निसर्गरम्य वातावरणामुळे अनेक मुंबईकरांनी आणि पारशी समाजाच्या नागरिकांनी उन्हाळ्याची सुटी आल्हाददायक आणि थंड वातावरणात घालविण्यासाठी बांधलेली दगड व सागवानाचा वापर करून बांधलेली कौलारू घरे हे देवळालीचे आकर्षण. मात्र, सध्या वाढलेल्या सीमेंटच्या जंगलामुळे वृक्षांची होणारी सर्रास तोड, वाढलेल्या कॅम्प हद्दीला लागूनच तयार होत असलेल्या इमारती, यामुळे देवळाली कॅम्पची थंड हवेचे ठिकाण अशी असलेली ओळख हरवत चालली असून, येथे मोठय़ा प्रमाणावर उकाडा जाणवत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईकरांनी यावर्षी उन्हाळ्याची सुटी घालविण्यासाठी या परिसराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ दहा टक्केच मुंबईकर आल्याचे कॅम्पवासीय सांगत आहेत.
एप्रिल महिना सुरू झाला, की लॅमरोड परिसर रोज सायंकाळी मुंबईकरांच्या वास्तव्याने गजबजलेला असतो. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांचे व्यवसायही तेजीत राहायचे. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी येथे बंगले, रो-हाउस आणि फ्लॅट खरेदी करून ठेवले. मात्र, यावर्षी उष्णता आणि दमट वातावरणामुळे देवळाली कॅम्प आणि नाशिकरोड परिसरात उकाड्यामध्ये वाढ झाल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
नाशिकलाही यंदा मुंबईसारखाच उकाडा जाणवत आहे. त्यामुळे यावर्षी नाशिकऐवजी उन्हाळ्याची सुटी मुंबईलाच साजरी करीत आहे. किशोर देसाई, मुंबईकर
मुंबईसारखाच उकाडा अन्यत्र जाणार
नाशिकचे तपमान वाढल्याने मुलांनी नाशिकऐवजी दुसर्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास हट्ट धरला आहे. त्यामुळे यंदा दुसर्या ठिकाणी जाणार आहे. अनिल जाधव, मुंबईकर
व्यवसायावर परिणाम
गत वर्षापर्यंत मुंबईकरांची कॅम्पला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठी गर्दी असायची. मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ दहा ते पंधरा टक्के मुंबईकरच असल्याचे दिसते. त्यामुळे स्थानिक व्यवसायावर परिणाम झाला आहे. -मिलिंद दशपुते, देवळाली कॅम्प