आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनात बेकायदा गॅस भरताना देवळालीत सिलिंडरचे स्फोट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वाहनात बेकायदा गॅस भरताना सुमारे 20 गॅस सिलिंडरचे भयंकर स्फोट झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास देवळालीतील महापालिका शाळेजवळ घडली. या गंभीर घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी गॅस भरणारा
अनिल माधव नायर (रा.देवळाली गाव) हा गंभीर जखमी झाला आहे. तर या प्रकरणी मनोज माधव नायर यास ताब्यात घेण्यात आले आहे.
नीळकंठ गोपाळ चंद्रात्रे यांच्या मालकीच्या सर्वे 39/6 क्षेत्र 0.70 आर महापालिकेच्या आरक्षित जागेत 20 बाय 40 च्या पत्र्याच्या शेडमध्ये वाहनात गॅस भरण्याचा अवैध व्यवसाय गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. त्यासाठी येथील गोदामात गॅसचा बेकायदा साठा करून ठेवला होता. एका वाहनात गॅस भरताना अचानक गॅसचा स्फोट झाला व एकावर एक रचलेले इतर सिलिंडरच्या स्फोटाची मालिकाच सुरू झाली. या स्फोटाच्या आवाजाचे धमाके सुमारे एक किलोमीटरपर्यंत ऐकू जात होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. बॉम्बस्फोट झाल्याच्या अफवाही पसरल्या. स्फोटानंतर सिलिंडरचे तुकडे आकाशात भिरकावले गेले होते. हा प्रकार पाहणा-यांच्या पोटात भीतीचा गोळाच उठला होता. दरम्यान, यातील बहुतांश सिलिंडर रिकामे असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले व अवघ्या 10 मिनिटांत आग आटोक्यात आणली. आग लागताच बाळासाहेब खेलूकर या महापालिकेच्या कर्मचाºयाने जिवावर उदार होऊन जळते सिलिंडर बाहेर काढले. तसेच जावेद शेख,बाबा शेख,कैलास मोरे,रविकिरण घोलप,बंटी कोरडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनीही आग विझवण्यासाठी परिश्रम घेतल्याने त्याची झळ परिसरातील घरांपर्यंत पोहोचली नाही. गोदामाशेजारील बबन गायकवाड यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू मात्र जळून खाक झाल्या.
स्फोट झाल्यानंतर गवळीवाडा येथे राहत असलेल्या 46 झोपडपट्टीतील रहिवाशांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या घरातील सिलिंडर बाहेर काढून घरातून पळ काढला. ही संधी साधून काहींनी सात सिलिंडर चोरून नेले. शेजारील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी भीषण आवाज ऐकून रडारड सुरू केली. त्यामुळे शिक्षक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना सुरक्षितपणे शाळेबाहेर काढले.
गोदामात किती सिलिंडर ?
स्फोटानंतर अग्निशमन अधिका-यांनी या गोदामात 116 सिलिंडर असल्याचे सांगितले. मात्र जसा जसा वेळ होत गेला तशी सिलिंडरची संख्या घटत गेली. अखेर पोलिसांनी गोदामात 98 सिलिंडर असल्याची नोंद केली तर देवळालीच्या तलाठ्याच्या आकडेवारीत 96 सिलेंडरची नोंद करण्यात आली.
दोन मशिन्स मिळाल्या
आग विझवताना अवैधरीत्या गॅस भरण्याच्या दोन मशिन्स, 36 व्यावसायिक व 80 घरगुती सिलिंडर सापडली. स्फोटाचा आजूबाजूच्या लोकांना धोका संभवू शकत होता. कर्मचा-यांनी 10 मिनिटांत आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशामक अधिकारी अनिल महाजन यांनी दिली.
खासदार भुजबळांकडून पोलिसांची झाडाझडती
भरवस्तीत सिलिंडर स्फोट झाल्यानंतर खासदार समीर भुजबळ यांनी पोलिस अधिका-यांची चांगलीच झाडाझडती घेतली. निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यावर त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला; मात्र एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यांच्यासह अन्य अधिका-यांना देता आले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा करून नागरी वस्तीत केल्या जाणा-या या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल भुजबळ यांनी केला. स्थानिक रहिवासी गप्प आहेत, म्हणजे त्यांचीही यास संमती असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
नाशकात 4 जीप जाळल्या, पोलिस चौकी समोर घडलेला प्रकार
मैत्रबहार सोसायटीत नऊ गाड्यांची जाळपोळ, नागरिक भयभीत