आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी शब्बीरकडून करून घेतले ‘प्रात्यक्षिक’;छायाचित्रणाची गंभीर दखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- लष्कराच्या हद्दीतील छायाचित्रण प्रकाराची केंद्र व राज्य स्तरावरील गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या संशयित शब्बीर हारून शेख याच्याकडून बुधवारी सकाळी छायाचित्रणाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रातील फोटो काढल्याच्या प्रकाराची माहिती कळल्यानंतर केंद्रीय, राज्य गुप्तचर व सुरक्षा यंत्रणा पथक देवळालीत दाखल झाले असून, स्थानिक पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवून आहे.

उपस्थित होणारे प्रश्न, शंकांबाबत पथकातील सदस्य स्वत:च शेखची चौकशी करत असून, उच्चस्तरीय तपास पथकातील सदस्य नाशकात तळ ठोकून असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

शब्बीर शेखने देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक, बस स्थानकासह प्रतिबंधित क्षेत्रातील काढलेल्या फोटोबाबतच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यात आल्या. देवळाली कॅम्प परिसरात तो कधी व कसा आला याची माहिती घेऊन पोलिसांनी त्याला संबंधित ठिकाणी फोटो काढल्याचे प्रात्यक्षिक करायला लावले. तो रेल्वे स्थानक, बस स्थानकावर कसा पोहोचला, याचीही पोलिसांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती घेतली. फोटो काढलेल्या दिवशीच देवळालीत आल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले. काही वर्षांपूर्वी बहीण येथे राहत असल्याने आठवणीसाठीच छायाचित्रण केल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी दिली.

दरम्यान, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी तपासाची माहिती जाणून घेतल्याचे समजते. वरिष्ठ स्तरावरून तपासावर लक्ष ठेवले जात असून, शेखच्या मूळ सोलापूर व सध्याच्या नवी मुंबई या वास्तव्याच्या ठिकाणांची माहिती संकलित करण्यात येत आहे.