आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील भाविक सिंहस्थ काळात रामकुंडात करू शकतील स्नान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंहस्थ पर्वणीच्या दिवशी रामकुंड परिसरात अफाट जनसागर उसळतो. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी घटना घडण्याची दाट शक्यता असते. या घटना टाळण्याच्या उद्देशाने स्नानासाठी यंदा रामकुंडासह पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे नाशिक शहरातून आलेले भाविक रामकुंडात स्नान करू शकतील. सिंहस्थ स्नानासाठी वेगवेगळी ठिकाणे निश्चित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सन 2015-16 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यासाठी एक कोटी भाविक शहरात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सरकारी यंत्रणेने नियोजन सुरू केले आहे. गेल्या सिंहस्थात सरदार चौक परिसरात चेंगराचेंगरीच्या घटनेत 36 भाविकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, पालिका व पाटबंधारे विभागाने विशेष नियोजन सुरू केले आहे. त्यात गोदावरी घाट विकासाचा प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने गुरुवारी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पालिका आयुक्त संजय खंदारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघाने, सहायक अभियंता विश्वास दराडे, शहर अभियंता सुनील खुने, अधीक्षक अभियंता यु. बी. पवार आदी अधिकार्‍यांनी प्रस्तावित घाटांच्या ठिकाणांची पाहणी केली व स्नानासाठी स्थळे निश्चित केली. दसक घाट परिसरात 10 लाख भाविक स्नानास येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली. येथे नाशिकरोड स्थानकाकडून येणार्‍या आणि पुणे व औरंगाबादच्या भाविकांना वळवण्यात येणार आहे. टाकळी घाटाकडे पुणे, धुळे व जळगावच्या भाविकांना वळविण्यात येईल. या भागात 25 लाख भाविक येण्याची श्क्यता आहे. टाळकुटेश्वर मंदिर व रामकुंड या दोन्ही ठिकाणी नाशिकच्या भाविकांना स्नान करता येईल. हा अंतिम पाहणी दौरा असून, यानंतर कामांना सुरुवात केली जाईल.


जिल्हाधिकार्‍यांकडे लक्ष
शहरातील नदीघाट विकासाची कामे यंदा महापालिकेकडून काढून यंदा ती पाटबंधारे विभागाकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी पाटबंधारे विभागाने 80 कोटी 76 लाखांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना स्नानासाठीची स्थळे निश्चित झाली आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडून पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावाला हिरवा सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत ही कोणतीही कामे सुरू होऊ शकणार नाहीत.


रामकुंड परिसर :
0 नाशिक शहरातून येणारे भाविक
टाळकुटेश्वर ते कन्नमवार पूल परिसर :
0 मुंबईच्या बाजूने येणारे भाविक
लक्ष्मीनारायण पूल ते कपिला संगम :
0पुण्याकडून येणारे भाविक
0 धुळे, जळगावकडून येणार भाविक
0 दिंडोरी रोडवरून येणारे भाविक


कपिला संगम :
0 केवळ साधुमहंतांसाठी राखीव
दसक घाट : 0नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडून येणारे भाविक
0 पुणे आणि औरंगाबादकडून येणारे भाविक