आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखी वाट: पांढरपेशा देवयानी, प्रतिष्ठेची लावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तमाशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी फडातीलच एखाद्या कलावंत महिलेच्या मुलीने स्वीकारलेली कला म्हणजे लावणी असा सर्वसाधारण समज. पण आई मुंबईत एका शाळेमध्ये पर्यवेक्षिका, वडिलांचा बॅगविक्रीचा व्यवसाय अशी मध्यमवर्गीय, सुशिक्षित पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील देवयानी चंदडकरने तो खाेटा ठरवत लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
फाईन आर्टची पदवी घेऊन पारंपरिक लावणी नृत्याचा खासा बाज आत्मसात करतानाच घुंगरू बांधून ‘बुगडी माझी सांडली गं’ची अदा ितने दाखवायला सुरुवात केलीय. देवयानीची ही लावणी शहरातील कलामंदिरांपुरतीच मर्यादित राहता सातासमुद्रापारही गाजतेय. एवढेच नव्हे तर येत्या मेस प्रदर्शित हाेणा-या ‘गब्बर’ हिंदी चित्रपटातील एक गाणे तिच्यावर चित्रित झाले आहे.

गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे लावणी. पण, मराठी चित्रपटांनी ितला इतके बदनाम केले की, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकाेणच बदलला. फडातल्या कलावंतिणीच्या मुलींनी ढोलकीच्या तालावर नाचावे, तक्क्यावर रेललेल्या गावच्या पाटलाने मिशा पिळत तिला दाद देता-देता पैशांमध्ये तिच्या शरीराचे मोल करावे असे ‘चित्र’ नकळत रुजले. पण, अशा नकारात्मक वातावरणातही देवयानीला लावणीने माेहिनी घातली. ितने नृत्य विषयात फाईन आर्टची पदवी घेतली आणि त्यानंतर लावणीतच आपले करिअर करीत या लाेककलेचा आदर केला. लावणीसम्राज्ञी माया जाधव, प्रियंका शेट्टी, मेघा घाडगे यासारख्या नर्तिकांना तिने गुरूसमान मानले. तिने महाराष्ट्रातील अनेक कलामंदिरांची व्यासपीठे गाजवली आहेत. महाराष्ट्र शासनाचेही तिला सहकार्य लाभले. शिवाय, अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर यासारख्या देशांतही तिने आपल्या कलेने रसिकांना घायाळ केले. पुढील महिन्यात तिचा इस्त्रायलमध्ये कार्यक्रम आहे. ख्यातनाम िदग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गब्बर चित्रपटात तिची लावणी लक्षवेधी ठरणार आहे. यापूर्वी तिने ‘शिक्षणाचा जय हाे’ या मराठी चित्रपटात तसेच ‘पवित्र रिश्ता’, ‘थाेडा है थाेडे की जरूरत है’ या मालिकांमध्येही तिने लावणीचा बार उडवला आहे. नाशिकमध्ये गुरुवारी तारका लावणीत्सव कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती तिच्या कलेला पावती देणारीच ठरली.

बीभत्स कार्यक्रमांनी लावणीकला डागाळली
काहीबीभत्स कार्यक्रमांमुळे कालिदासला डान्सबारचे स्वरूप आले हाेते, ही गाेष्ट मी एेकली आहे. असे प्रकार एेकून दु:ख हाेते. रक्ताचे पाणी करून लावणीचा लाैकिक वाढवणा-या कलावंतांचा हा अवमान आहे. खरे तर लावणीचे सामर्थ्य खूप माेठे आहे. आज अनेक सुशिक्षित उच्चभ्रू घरातील मुली लावणीकलेकडे आकर्षित हाेत आहेत. त्यात करिअर करीत आहेत. त्यामुळे या कलेकडे पाहण्याचा लाेकांचा दृष्टिकाेनही आता बदलताना दिसत आहे. मी कधीही लावणीच्या कार्यक्रमात आयटम सॉंगवर नृत्य करीत नाही. देवयानी चंदडकर, लावणी नर्तिका