आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये ढोकेश्वर मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखांवर पोलिसांचे छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोकेश्वर मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नाशिक जिल्ह्यातील शाखांवर छापे टाकण्यात आले आहेत. - Divya Marathi
ढोकेश्वर मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नाशिक जिल्ह्यातील शाखांवर छापे टाकण्यात आले आहेत.
नाशिक/लासलगाव- ढोकेश्वर मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे 10 शाखांसह चेअरमन असलेले सतीश काळे यांच्या राहत्या घरी पोलिसांनी कारवाई करत छापे मारले आहेत. राज्यभरात सोसायटीच्या 175 शाखा आहेत. युवकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैशांची लूट केल्याचा आरोप या सोसायटीवर करण्यात येत आहे. लासलगाव पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुमारे 10 शाखांवर पोलिसांनी छापे मारले आहेत .
 
नोकरीचे आमिष
या मल्टिस्टेट सोसायटीचे मुख्य कार्यालय लासलगाव येथे आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये विंचूर येथे शिक्षक असलेले सतीश काळे यांनी सुरुवातीला हरिओम ग्रुपची स्थापना केली. त्यांनी प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले. त्यानंतर सतीश काळे यांनी ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीची स्थापना केली. ढोकेश्वर सोसायटीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी काही ठराविक रक्कम युवकांकडून घेतली जात होती. 50 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात येत होती. कमी पैशात नोकरी मिळत असल्याने अनेक युवक याला बळी पडले. हजारो युवकांनी पैसे देऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले.

मनमाड येथील तक्रार    
नोकरीसाठी पैसे भरू न ही ते मिळत नाहीत तसेच आपल्या नातेवाईकांकडून मुदत ठेवी या सोसायटीत जमा केल्याने अनेक युवकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. लासलगाव पोलिस कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्याकडे मनमाड येथील तक्रारदाराने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या तक्रारीनुसार नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे व सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्यासह पथकाने नाशिक जिल्ह्यातील सुमारे 10 शाखा व सतीश काळे यांच्या राहत्या घरी छापे मारले आहेत .
                     
कुठे मारले छापे
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील मुख्य कार्यालय, कळवण, नांदगाव, मनमाड, घोटी, नाशिक शहर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प या ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत. या ठिकाणांवरून संगणक कागदपत्रे व फायली, पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहे. दरम्यान सतीश काळे फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
   
               
बातम्या आणखी आहेत...