आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी फोडली डिझेलवाहिनी, निफाडला लाखाे लिटर इंधन वाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव, नाशिक- मुंबईहून मनमाडकडे जाणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची (बीपीसीएल) भूमिगत डिझेलवाहिनी खानगाव थडी (ता. निफाड) शिवारात चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडून डिझेल चोरीचा प्रयत्न केला. त्यामुळे लाखो लिटर डिझेल शेतजमिनीत पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने वाहिनी बंद करण्यात आली. गुरुवारी रात्री दुरुस्ती पूर्ण झाली. मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने परिसरातील पिके धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. अनेक ठिकाणी डिझेल विहिरींमध्ये उतरण्याची शक्यता असून पाणी दूषित होऊ शकते. दरम्यान, वाहिनी बंद असल्याने नेमके किती डिझेल वाया गेले याचा उलगडा कंपनीला होऊ शकला नाही.  


बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वाहिनी फोडण्याचा प्रकार घडल्याची शक्यता आहे. याबाबत माहिती मिळताच  कंपनीचे मनमाड येथील अधिकारी घटनास्थळी गुरुवारी सकाळपासून दाखल झाले. तुटलेली वाहिनी जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळच गोदावरी वाहत असल्याने नदीत डिझेल उतरू नये यासाठी जेसीबीद्वारे मोठ्या खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली अाहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल साचले असून ते टँकरमध्ये भरून कंपनीच्या पानेवाडी येथील प्रकल्पाकडे रवाना केले जात आहे. त्यानंतर प्रकल्पात या इंधनाची तपासणी होईल. दरम्यान, नदीवर डिझेलचे तवंग तयार झाल्याचे दिसत आहे. 


इंधन टंचाईची शक्यता नाही   
पानेवाडी येथील कंपनीच्या साठवणूक प्रकल्पात कायम सात दिवस पुरेल एवढा पेट्रोल व डिझेलचा साठा असतो. त्यामुळे इंधन टंचाई जाणवण्याची शक्यता नाही, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. १८ इंच असलेल्या या वाहिनीतून अति उच्च दाबाने इंधन सोडले जात असल्याने १० ते १५ मिनिटांतही लाखो लिटर इंधन वाहून जाण्याचा धोका आहे.  


स्कँडा प्रणालीमुळे प्रकार उघड   
चोरी झाल्यानंतर किंवा वाहिनी फोडल्यानंतर त्याची माहिती तत्काळ मिळण्यासाठी स्कँडा प्रणालीची व्यवस्था असते. त्याच आधारे मध्यरात्री एक वाजता हा प्रकार उघडकीस आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  


जानेवारीत फुटली होती वाहिनी   
सिन्नर- आगासखिंड (ता. सिन्नर) शिवारात २७ जानेवारीला जमिनीचे सपाटीकरण सुरू असताना पोकलेनचा नांगर घुसून डिझेल वाहिनी फुटली होती. अर्धा तास २०० फूट उंच डिझेलचे कारंजे उडत होते. त्यामुळे दोन एकरांच्या परिसरात जागोजागी डिझेलचे तळे तयार झाले होते. पानेवाडीपर्यंतचे १७ व्हाॅल्व्ह संगणकाच्या साहाय्याने बंद होईपर्यंत लाखो लिटर डिझेल वाया गेले. वाहिनी दुरुस्तीसाठी तीन दिवस लागले होते.  

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...