आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तियात्रा:विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा..’ जयघोष करीत राज्याच्या विविध भागांमधून येत असलेल्या अनेक दिंड्या शहरातून त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहेत. मजल - दरमजल करीत आलेल्या या दिंड्यांमधील भाविकांची अतूट र्शद्धा आणि त्यांच्या निष्ठेकडे कुतुहलाने न्याहाळत महानगरवासीयांनीदेखील मनोमन माउलींना वंदन केले. शहरातील दानशूरांनी महानगरात आलेल्या दिंड्यांना पंगती वाढून पदरी पुण्य बांधले.

षट्तिला एकादशीला होणार्‍या संत निवृत्तिनाथांच्या यात्रेसाठी महानगराच्या सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरून रविवारी राज्याच्या अनेक भागांमधून आलेल्या दिंड्यांमधील वारकर्‍यांच्या टाळ-मृदंगाच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते. एक दिंडी नगर जिल्ह्यातील तर एखादी धुळे जिल्ह्यातील, तर एखादी मराठवाड्यातील अशा अनेक दिंड्यांमधून शेकडो वारकरी यात्रेसाठी मार्गस्थ झाले.


पांडुरंग सारं बघून घेतो
25-30 वर्षांपासून वारी करते आहे. वारीमध्ये पांडुरंगच सारं काही बघून घेत असल्याने आम्हाला कधीच अडचण येत नाही. लोक आम्हाला घरी नेऊन जेवायला घालतात. प्रत्येक दिंडीतून केवळ आनंदच लाभला आहे.
-वत्सलाबाई हौशीराम खताळ, संगमनेर

असं मैलभर चालवत नाही; पण..
घरापासून शेतापर्यंत मैलभर चालवत नाही. पण, माउलींच्या आणि नाथांच्या दिंडीत दररोज दहा मैल चालतो तरी त्याचे कष्ट होत नाहीत. इतक्या वर्षांमध्ये पाय थकले असले तरी मनाची ओढ कायम आहे.
-पांडुरंग धोंडीबा कुर्‍हाडे, मढी बु. कोपरगाव

कोपरगाव -
शंभरहून अधिक वार्‍या
माझे वयच शंभरपेक्षा जास्त आहे. मला आठवतदेखील नाही इतक्या बालपणापासून मी वारी करीत आहे. मोठा झाल्यापासून दरवर्षी संत निवृत्तिनाथांची, माउलींची आणि सोपानकाकांची वारी करतोय. शंभरहून अधिक वार्‍या केव्हाच होऊन गेल्या आहेत. फक्त तीन महिने शेती करतो, बाकी वारी करीतच फिरत राहतो.
- गोविंदमहाराज संन्यासी, पंढरपूर

मनाला ओढ लागते
चार वर्षांपासून दरवर्षी नाथांच्या यात्रेची ओढ लागते. मार्गातील गावकरीदेखील मोठय़ा प्रेमाने जेऊ-खाऊ घालत असल्याने आपण काहीतरी विशेष करीत असल्यासारखे वाटते.
- सागर दिघे, मढी बुद्रुक, कोपरगाव

वारीची परंपरा कायम
माझ्या लग्नानंतर घराण्यातील वारीची परंपरा चुकवलेली नाही. सात वर्षांहून अधिक काळापासून यात्रा करतेय. पण, तरी दरवर्षी यात्रा नव्यानेच करत असल्यासारखे वाटते.
- सुनंदा रवींद्र पाटील, श्रीक्षेत्र देवळी, ता. धुळे