आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छताच सर्वत्र ‘वास’ करी..., चार दिवसांत उचलला १५०० टन कचरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घर, दुकाने तसेच, अन्य आस्थापनांची स्वच्छता केली जात असल्याने या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढतो. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मोठ्या प्रमाणावर रिकामी खोकी, फाेडलेल्या फटाक्यांचा कचरा पसरताे. हातगाडीवरील विक्रेत्यांसह अन्य विक्रेतेदेखील या समस्येत भर टाकत असतात. यामुळे माेठ्या प्रमाणावर सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. अशा स्थितीत हा कचरा उचलण्यासाठी अाराेग्य विभागाकडून विशेष नियाेजन हाेणे गरजेचे असताना याउलट स्थिती ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत शनिवारी शहरातील विविध भागांत दिसून अाली. सफाई कर्मचाऱ्यांची सुटी, त्यातच घंटागाडी ठेकेदार कर्मचाऱ्यांतील वेतनावरून सुरू असलेला वाद, नागरिक तसेच प्रशासनाची स्वच्छतेप्रति उदासीनता यामुळे अाराेग्याचा प्रश्न गंभीर झाला अाहे. अगाेदरच साथीच्या अाजारांनी शहरात डाेके वर काढले असताना अाता या अस्वच्छतेमुळे पालिकेच्या अारेाग्य विभागापुढे अाव्हान उभे ठाकले अाहे.
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग
दिवाळीमुळे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून, अनेक ठिकाणी दुर्गंधीदेखील वाढली आहे. दिवाळी संपल्यावरही अनेक रस्ते, चाैकांतील कचरा मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी उचललेला नसल्याने ही परिस्थिती उद‌्भवली असल्याचा अाराेपही अनेक नागरिकांनी केला अाहे. फटाके फोडल्यानंतर त्याचा कचरा कित्येक दिवस तसाच पडून असल्याने अस्वच्छतेत माेठ्या प्रमाणावर भर पडत अाहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले अाहेत.

स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची वानवा
लक्ष्मीपूजनवा पाडव्याची धामधूम संपल्यानंतर शनिवारी सकाळी ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता, जागोजागी विद्रुप चित्र दिसून अाले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्माण हाेणारा कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे किंवा अाहे त्या कर्मचाऱ्यांत याेग्य नियाेजन करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र याकामी कुठल्याही हालचाली झाल्याचेच दिसून अाले. यामुळे ही समस्या अधिक जटिल झाल्याच्या तक्रारी अाहेत.

शहरात अनेक ठिकाणी घंटागाडी वा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलला गेल्याने बऱ्याचदा नागरिकांकडून ताे जाळला जात असल्याचे दिसून अाले. यामुळे पर्यावरणाला अधिक धाेका निर्माण हाेत अाहे.

२९२ टन कचरा १० नाेव्हेंबरला
४३९ टन कचरा ११ नाेव्हेंबरला
४०१ टन कचरा १२ नाेव्हेंबरला
४०१ टन कचरा १३ नाेव्हेंबरला

जुन्या नाशकातही अाेंगळवाणे चित्र
जुन्या नाशकातील शालिमार, खडकाळी सिग्नल परिसर, जीन मंझील परिसर, फुले मार्केट परिसर, बागवानपुरा येथील रॉबीन भवनजवळील परिसर, लक्ष्मी चाळ परिसर, वडाळानाका परिसरासह काठेगल्ली परिसरातील गणेश उद्यानाजवळ गेल्या दोन दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे पडून असल्याचे दिसून अाले. या ब्लॅक स्पाॅट‌्सबाबत महापालिका प्रशासनाच्या स्मार्ट अॅपवर वारंवार तक्रार देऊनही अद्याप स्वच्छता झालेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी असेच चित्र असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले.

घंटागाडीच अाली नाही...
^गेल्या दोन दिवसांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोळे कॉलनी परिसरात साचलेला कचरा उचलण्यासाठी शनिवारी तरी घंटागाडी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. यामुळे परिसरात अद्यापही माेठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. गोरख चौधरी, केमिस्ट असोसिएशन

तक्रार करूनही हाेतेय दुर्लक्ष...
^गेल्या दोन दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. त्र्यंबक दरवाजा परिसरातील कचऱ्याच्या स्पाॅटबाबत पालिकेकडे तक्रार देऊनही अधिकारी दुर्लक्षच करीत आहेत. असेच हाेत राहिल्यास ‘सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक’ संकल्पना साकार हाेणार तरी कशी? संजयमहाले, नागरिक

कचऱ्याच्या प्रमाणात माेठी वाढ
दिवाळीच्या निमित्ताने घर, दुकाने आणि अन्य आस्थापनांची स्वच्छता माेठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच, अन्य बाबी, खरेदी केलेल्या वस्तूंचे रिकामे खाेके, प्लास्टिक कॅरीबॅग अशा अनेक गाेष्टींमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढते. दिवाळीच्या प्रमुख तीन दिवसांत शहरात सरासरी ३७५ ते ४०० टन एवढा कचरा जमा झाल्याचा अंदाज पालिकेकडून वर्तविण्यात अाला अाहे. इतर दिवशी हा कचरा ३०० ते ३२५ टन एवढा असतो.

गोदाघाट, पंचवटी परिसरात सर्वाधिक कचऱ्याचे ढिगारे
दिवाळीतपंचवटी परिसरातील गोदाघाटावर सर्वाधिक फटाके फोडले गेले. यामुळे गोदाघाटावरील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले. एकीकडे गोदाकाठावर येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली असून, अाता या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे पर्यटक, भाविकांना अाेंगळवाणे दर्शन घडत अाहे.

३० घंटागाड्यांची कमतरता
देशाला आदर्श ठरणारा घनकचरा प्रकल्प अपुऱ्या यंत्रसामग्रीमुळे पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. शहर परिसरातून कचरा आणणाऱ्या १७० घंटागाड्यांपैकी पालिकेच्या १२० घंटागाड्या आहेत, तर ५० ट्रॅक्टर ठेकेदारांचे आहेत. मात्र प्रचंड कचऱ्यामुळे सर्वच ठिकाणी घंटागाड्या नियमित फिरत नाहीत. सुमारे २० ते ३० घंटागाड्या कमी पडतात. त्यामुळे महासभेत नवीन घंटागाड्यांना मंजुरी देण्याचा ठरावही झालेला आहे.

शहरात दररोज राहतो ३० टन कचरा पडून
घंटागाडीच्या माध्यमातून रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पात प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्माण केले जाते. परंतु, कचऱ्याचे प्रमाण प्रचंड असल्याने तेवढ्या प्रमाणात ना कचरा संकलित होतो, ना प्रक्रिया होते. स्वच्छतेवर पालिका वर्षाला तब्बल १२ कोटी रुपये खर्च करते. शहरात रोज निर्माण होणाऱ्या ३९० टन कचरा संकलनासाठी पालिकेकडे २००० कर्मचारी, तर १७० घंटागाड्या आहेत. त्यातील ३५० ते ३६० टन कचरा संकलित होतो, तर रोज ३० टन कचरा पडून राहतो. पालिकेच्या पर्यावरण अहवाल २०१२ मध्ये हे उघड झाल्यावरदेखील तीन वर्षांनंतरही पावले उचलली गेलेली नाहीत.