आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन गावांना दूषित पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदूरशिंगोटे - कणकोरीसह पाच गावे पाणीपुरवठा योजनेचे शुद्धीकरण केंद्र ठप्प असल्याने योजनेंतर्गत येणाºया तीन गावांना दूषित पाणीपुरवठा होत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालाने अजूनच खळबळ उडाली आहे.

2002 मध्ये सुरू झालेल्या पाणी योजनेच्या शुद्धीकरण केंद्राची मुदत 2012 ला संपुष्टात आल्यानंतर त्याच्या दुरुस्तीची कामे होणे अपेक्षित होते. परंतु, तसे प्रयत्न न झाल्याने अखेर शुद्धीकरण केंद्राचे कामकाज ठप्प झाले आहे. नांदूरशिंगोटेसह कणकोरी, मानोरी या तीन गावांतील सुमारे 15 हजार ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

शुद्धीकरण केंद्राची दुर्दशा
योजना सुरू झाल्यापासून एकदाही दुरुस्तीचे काम झाले नाही. जलशुद्धीकरण केंद्रातील मिक्सर बंद पडला असून, वाळू कालबाह्य झाल्याने पाण्याचे शुद्धीकरण होत नाही. टीसीएल पावडरचा वापरही अपुरा ठरत अहे. केंद्रातील यंत्रणेसह बांधकामाची डागडुजीही होणे गरजेचे आहे. त्यासाठी 25 लाखांवर खर्च अपेक्षित असून, तो करण्यावर ग्रामपंचायती असमर्थ ठरत आहेत.

दूषित पाण्याचा पुरवठा
भोजापूर धरणात म्हाळुंगी नदीच्या पुराचे पाणी आल्याने साठ्यातील पाणी गढूळ झाले आहे. शुद्धीकरण केंद्राचे कामकाज ठप्प झाल्यामुळे दूषित पाण्याच्या पुरवठ्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी शुद्धीकरण करून सोडावे, अशी मागणी शंकरराव शेळके, लक्ष्मण शेळके, आनंदा शेळके आदींनी केली आहे.

पाणी पिण्यायोग्य नाही
मातीमिश्रित गढूळ व दूषित पाणीपुरवठ्याचे नमुने आरोग्य विभागातर्फे गोळा करण्यात आले होते. प्रयोगशाळेत पाण्याची चाचणी घेतल्यानंतर पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल डॉ. वाल्मीक मोकळ यांनी ग्रामपंचायतीस दिला आहे. महिन्याभरापासून दूषित पाणी असा अहवाल येत असल्याने गांभीर्य वाढले आहे.

प्रस्ताव मंत्रालयात
ग्रामपंचायतींनी वर्षभरापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेस सादर केला होता. मंजुरीसाठी तो मंत्रालयाकडे पाठवला असल्याचे पदाधिकाºयांना सांगण्यात आले. वर्षभरात त्यावर कोणताही विचार झाला नसल्याने ग्रामपंचायतींच्या चिंतेत भर
पडली आहे.

आजारांची भीती
दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याची भीती आहे. योजनेचे पदाधिकारी दखल घेत नसल्याने दूषित पाणी प्यावे लागत आहे. शंकरराव शेळके, माजी सरपंच

पाणी पिण्यायोग्य नाही
पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. महिनाभरापासून दूषित पाणी येत असून, तसा अहवाल ग्रामपंचायतीकडे सादर केला आहे. पाणी पिण्यायोग्य नाही. डॉ. वाल्मीक मोकळ, आरोग्याधिकारी

टीसीएलचा वापर होतो
- शुद्धीकरण केंद्र कालबाह्य झाले आहे. तथापि, टीसीएलचा वापर केला जातो. दुरुस्ती प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. टंचाई योजनेतून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रवींद्र शेळके, उपसरपंच, नांदूरशिंगोटे