आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बल्ली बॅरिकेडिंगमुळे तिगरानिया चौकात पालक विद्यार्थी हैराण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात शहरात सर्वाधिक भाविक येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रमुख मार्गांवर लोखंडी बॅरिकेडिंगचे नियोजन करतानाच हायवेवर बल्ल्यांच्या साहाय्याने बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. मात्र, हे बॅरिकेडिंग परिसरातील पादचारी, पालक विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. या परिसरातील काही ठिकाणचे बॅरिकेडिंग काढून विद्यार्थ्यांना नागरिकांना ये-जा करण्यासाठी जागा सोडावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

टाकळी रोड परिसरातील तिगरानिया चौकात महामार्गाच्या एका बाजूला रवींद्रनाथ विद्यालय, रंगूबाई जुन्नरे अटलबिहारी वाजपेयी शाळा अाहे, तर दुसऱ्या बाजूला डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय अनेक खासगी क्लासेस आहेत. त्यामुळे या भागातून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी पालक या रस्त्याने ये-जा करतात. मात्र, साधुग्राममध्ये भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी मुख्य औरंगाबादरोडसह तपोवनाकडे जाणारे काही मुख्य आणि अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचे नियोजन केले आहे.

तसेच, स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन काही ठिकाणी पोलिस आयुक्तांनी नियोजनात काही बदल सुचवत महामार्गावरील रस्त्यांवर बल्लीच्या बॅरिकेडिंगचेही नियोजन केले. मात्र, मुंबई नाक्यापासून द्वारका पुढे औरंगाबाद नाक्यापर्यंत बल्ली बॅरिकेडिंग तीन आठवड्यांपूर्वीच करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांसाठी ते चांगलेच तापदायक ठरत आहे. या बल्ली बॅरिकेडिंगमुळे विद्यार्थ्यांना पालकांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण होत असून, बॅरिकेडिंगवरून पडून काही विद्यार्थी जखमीदेखील झाले अाहेत. त्यामुळे योग्य ठिकाणी जागा सोडण्याची मागणी जोर धरत आहे.