आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्माच्या अाधारे डावे उजवे ठरविणे हाच दुर्गुण, परिसंवादातील सूर; राज्य संस्थेने चालक रहावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दृष्कृत्य थांबविण्याचे संरक्षणात्मक हक्क देणे हे राज्य संस्थेचेच काम अाहे. पण पाेषणात्मक हक्क हे क्षमतेवर अवलंबून असल्यामुळे ते मत मिळण्याच्या नादात हा हक्क वाटत सुटाल तर त्यांची पूर्ती करण्याचे कर्तव्य काेण करणार?’ असा सवाल करीत राज्य संस्था कामधेनू नसल्यामुळे या संस्थेने मुळात चालक रहावे, पालक बनू नये, असा सूर प्रसिद्ध तत्त्वज्ञ राजीव साने अाणि कलावंत दीपक करंजीकर यांच्या उपस्थितीतील परिसंवादात व्यक्त झाला. हिंदुत्ववाद म्हणजे उजवे असे नसते. मुळात धर्माच्या अाधारे डावे उजवे ठरविणे हाच दुर्गुण मानायला हवा, असेही यावेळी सांगण्यात अाले. त्यांची मुलाखत ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित अाणि डाॅ. अजय ब्रह्मनाळकर यांनी घेतली.
 
व्यावहारिकतेला संधिसाधूपणाशी जाेडू नये. जगातले कुठलेच तत्त्वज्ञान हे व्यवहारवादी झाल्याशिवाय पुढे जात नाही. सांस्कृतिक अाणि अार्थिक बाबी यांत अाणि डावे उजवे यांत फरक अाहे. पश्चिम द्वेष अाणि पूर्व गाैरव तसेच काहीसा हुकूमशाहीकडे असलेला कल हा निश्चित दुर्गुण म्हटला पाहिजे. खरेतर सर्वधर्मसमभाव ही सेक्युलॅरिझमचे अत्यंत चुकीचे भाषांतर अाहे. सेक्युलॅरिझमचे भाषांतर इहवाद हेच अाहे. कुठल्याही व्यक्तीला वागणूक देताना तिचा धर्म म्हणून भेदभाव केला जाणार नाही, असा नि:पक्षपाती अाणि इहवादी असा सेक्युलॅरिझमचा खरा अर्थ अाहे. अल्पसंख्याक ही दुबळी बाजू अाहे अाणि ती डावी असल्यामुळे अापण त्याकडे बघितले पाहिजे हेच चुकीचे अाहे. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली बहुसंख्य असलेल्या धर्माच्या लाेकांच्या भावनांना धार्मिकता म्हणून अव्हेरायचे अाणि अल्पसंख्याकांच्या धार्मिकतेला पाठीशी घालायचे हेदेखील तितकेच चुकीचे अाहे.

अशा पक्षपाताला माेठी प्रतिक्रिया असते, जी हिंदुत्ववाद्यांच्या पथ्थ्यावर पडते. खरी संकल्पना सर्वधर्मसमादर अशी नसून सर्वधर्मसमअादर अशीच अाहे. धर्म समान नसल्यामुळे सर्व धर्मांना समान वाव देऊ असे म्हणण्यास काहीच अर्थ नसताे. प्रत्येक धर्मातील दाेष वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळे अाहेत. सत्ताधारी हिंदुत्ववाद्यांमधील काहींच्या निर्णायक दाेषांना प्रतिकार करणे म्हणजे डावे हाेणे असेही मानायचे कारण नाही. कारण, हिंदुत्ववाद म्हणजे उजवे असे नसते. सांस्कृतिक पातळीवर धर्माच्या अाधारे डावे उजवे ठरविणे हा दुर्गुण मानायला हवा. तसेच बहुसंख्याक जमातवाद मानणेे हादेखील दुर्गुण मानायला हवे. समूहाचे कल्याण अाणि अकल्याण हेच मुळात अयाेग्य अाहे. भाेक्ते अाणि कर्ते ही व्यक्ती असते. तसेच झुंडशाहीच्या मानसिकतेत जाते तीदेखील व्यक्तीच असते. झुंडीला मन नसते. मन हे व्यक्तीलाच असते अाणि अन्यायही व्यक्तीवरच हाेताे. त्या अन्यायाची उत्तरेही व्यक्तीगणिक द्यायला हवीत. त्यासाठी समूह करणाऱ्या व्यक्तींना त्या समूहाच्या हित म्हणजे तुझे हित असे शिकविणे हेच चुकीचे अाहे. समूहवाद मान्य केला की कुठल्याही झुंडशाहीला पाठिंबा देण्यासारखे हाेते.

ज्यावेळी भांडारकर घटना घडली त्यावेळी वारकऱ्यांना काहीही कळत नसताना त्यांनी डाऊ कंपनी हाकलून लावली ही झुंडशाहीच अाहे. मुळात, डावी विचारसरणी ही कम्युनिस्टांमधून अाली अाणि ‘लाेकशाही समाजवाद’ असे तिचे अाधुनिकीकरण झाले. डावी विचारसरणी ही समष्टींसाठी व्यक्तीने त्याग केला पाहिजे याच अाधारावर अाहे. राष्ट्रवादी विचारसरणीही तशीच अाहे. त्यामुळे या दाेघांमध्ये जुळतेच. सक्तीचा उपयाेग वाईट गाेेष्टी राेखण्यासाठी करता येईल. पण, चांगल्या गाेष्टी करायला लावणे याची सक्ती करता येणार नाही. त्यामुळे चांगल्या गाेष्टींसाठी स्वातंत्र्यांनाच वाव दिला पाहिजे. राष्ट्रवादी, धर्मवादी अाणि कम्युनिस्ट हे समिष्टावादी गट असल्याने व्यक्तीचे महत्त्व बाजूला पडले अाहे. सद‌्गुणांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांना या तिघांमध्ये जागाच राहिली नाही. दृष्कृत्य थांबविण्याचे संरक्षणात्मक हक्क देणे हे राज्य संस्थेचेच काम अाहे. पण, पाेषणात्मक हक्क हे क्षमतेवर अवलंबून असल्यामुळे ते मत मिळण्याच्या नादात हा हक्क वाटत सुटाल तर त्यांची पूर्ती करण्याचे कर्तव्य काेण करणार? राज्य संस्था कामधेनू नाही. राज्य संस्थेने मुळात चालक रहावे, पालक बनू नये. मायबाप सरकार अाले तर बालबुद्धीचे मतदार येणार. त्यामुळे सरकारने मायबाप हाेणे थांबवून चालकच व्हावे.
 
सांस्कृतिक क्षेत्रात डावे, उजवे असे काही नसते : दीपक करंजीकर
व्यावहारिकराजकारणाकडे सत्कारात्मक दृष्टीने बघायला हवे. डावे अाणि उजवे ही एकमेकांवर अवलंबून असणारी संकल्पना अाहे. राजकारणातील व्यावहारिकतेला संस्कृती, समाजजीवन, इतिहास, अार्थिक बाबी यांचे संदर्भ जाेडले गेले अाहे. डावा मेंदू हा तर्कशुद्ध असताे अाणि उजवा मेंदू हा भावनिक असताे. त्यामुळे डावे जेव्हा म्हणताे तेव्हा व्यक्ती अाणि उजवा म्हणजे समाज असा अर्थ त्यात प्रतित हाेताे. भावनांचे इझम जाेपासले जातात, तेथे उजव्या प्रकारचे लाेक असतात असे म्हटले जाते. परंतु, सांस्कृतिक क्षेत्रात कलाकृती किंवा सृजन यात डावे, उजवे असे काही नसते. सृजनाच्या अाविष्कारात व्यक्तिवादी, समवादी असे भाग करून त्याचा अर्थ स्पष्ट हाेत नाही. पुरस्कार वापसीसारख्या घटनांमधून अापल्याला ते प्रतिक्रियात्मक वाटते. परंतु, त्याच्या खाेलात गेल्यावर वेगळे चित्र दिसते.

चिकित्सा करणे हा व्यक्तीचा गुणधर्म अाहे. ताे समाजाचा असू शकत नाही. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात चिकित्सक सृजन अाहेत. त्यांच्याबाबतीत उदारमतवाद अापाेअाप येताे. सांस्कृतिक क्षेत्रात डावे-उजवे हे टीअारपीसाठी किंवा फॅशनेबल वाक्य म्हणून वापरतात. परंतु वस्तुस्थितीत त्याचे अस्तित्वच नसते. संवेदनशीलतेत भीती अाली की व्यक्ती समूहाकडे झुकायला लागते. कारण समूह हा त्याचा स्त्राेत असताे. ‘घाशीराम काेतवाल’सारख्या नाटकांतून ब्राह्मणांची बदनामी केली असे म्हणणे म्हणजे ब्राह्मणांत असलेली भीतीच अधाेरेखित करणे. सत्यनारायण करणारे वैयक्तिक अायुष्यात समाजवादी असल्याचे दिसतात, तसेच वैयक्तिक अायुष्यात घाशीराम अप्रतिम नाटक अाहे असे म्हणणारे ब्राह्मणदेखील दिसतात. व्यावहारिक राजकारणात समूहाचे निकष असतात अाणि त्याचाच फायदा उचलला जाताे. त्यामुळे व्यक्ती समूहाकडे जाणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्यातून प्रतिक्रिया कमी हाेतील. समूहाचा नेता हा भूमिका ठरवताे. बाकीच्यांना मेंढराइतकीच किंमत असते.
बातम्या आणखी आहेत...