आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळा खेळ फक्त ‘टीआरपी’चाच, लिटरेचर फेस्‍टीव्‍हलमध्‍ये उलगडले मालिकांचे मानसशास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहिन्यांनी प्रेक्षकांची अभिरुची घडवावी, प्रबोधन करावे, सकारात्मकतेला प्रोत्साहन द्यावे, सामाजिक दायित्व पार पाडावे... हे सारे कधीच इतिहासजमा झाले आहे. आता आठवड्याच्या दर गुरुवारी जाहीर होणारे ‘टीआरपीचे रेटिंग’ हाच वाहिन्यांचा एकमेव निकष असल्याचे वास्तव प्रेक्षकांसमोर आल्यावर वाहिन्यांवरील मालिका आवडीने पाहणारे, त्यावर चर्चा करणारे प्रेक्षक अवाक् झालेच, पण टीआरपी रेटिंग ठरवणारेही आपणच आहोत, या वास्तवाचा धक्का अधिक जाणवला तो दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आयोजित ‘मालिकांचे मानसशास्त्र’ या विषयावरील चर्चेच्या निमित्ताने सचिन मोटे, चिन्मय उद‌्गीरकर आणि सचिन गाेस्वामी यांनी वाहिन्यांवर लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून वावरताना आलेले अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले आणि प्रेक्षकांनाही या चर्चेत सहभागी करून घेत मनोरंजनाचा वेगळा मासला पेश केला.
 
टीआरपी रेटिंग हाच निकष : दूरदर्शनच्या काळात कुठलीही स्पर्धा नव्हती, मोजक्याच लोकांकडे दूरदर्शनचा संच असल्याने प्रेक्षकसंख्याही मर्यादित होती, हे दृकश्राव्य माध्यम प्रेक्षकांनाही नवे होेते, या कारणांमुळे दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल त्या काळात होती. बदलत्या काळात वाहिन्यांत स्पर्धा सुरू झाली. अधिकाधिक प्रेक्षक मिळवण्यासाठी क्लृप्त्या लढवल्या जाऊ लागल्या. तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली तशी घरोघरी वाहिन्या दिसू लागल्या. मनोरंजनाचे निकष बदलले आणि स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वेक्षणांचे आधार घेणे सुरू झाले. त्यालाच ‘टीआरपी रेटिंग’ म्हटले जाते. प्रत्येक वाहिनीत दर गुरुवारी या रेटिंगनुसार मालिकेत बदल करणे अपरिहार्य मानले जाते, अशी नवी माहिती प्रेक्षकांना मिळाली.
 
प्रेक्षकांचा कौल महत्त्वाचा : चिन्मय म्हणाला, ‘व्यक्तिरेखा साकारताना मालिकेच्या तर्कशास्त्राचा विचारही करता येत नाही. प्रेक्षकांना जो बदल हवासा वाटतो, आवडतो तो ट्रॅक लेखक विकसित करतो आणि तोच चालविला जातो. कथानक, आशय, तर्कशुद्धता वगैरेचा विचार अप्रस्तुत ठरतो. आपले मत कुणी विचारत नाही हे ध्यानात घेऊनच मालिकेत काम करावे लागते. त्यामुळे इतक्या मालिकांत काम करूनही प्रेक्षकांची मानसिकता समजलेली नसल्याचे त्याने प्रांजळपणे सांगितले.
 
महिलाच जय-वीरू, महिलाच गब्बर
मालिकांचाविषय प्रेक्षकांच्या किती जिव्हाळ्याचा आहे, याचे दर्शन या चर्चेच्या निमित्ताने घडले. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले प्रेक्षागृह, दाटीवाटीने उभे असलेले प्रेक्षक आणि प्रत्यही दिसणारे, आवडणारे चेहरे प्रत्यक्ष भेटल्यावरचा आनंद यांचा मिलाफ प्रेक्षागृहात दिसत होता. ‘शोले’ चित्रपटाचा संदर्भ घेत, सध्या मालिकांमधून जय-वीरू या व्यक्तिरेखाही महिलाच करतात आणि खलनायक गब्बरसिंगही महिलाच साकारतात, अशी टिप्पणी होताच प्रेक्षागृहात हास्यकल्लोळ झाला.
बातम्या आणखी आहेत...