आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरवर संगत अन् प्रत्येक वेळी दुमत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकची जागा काँग्रेसला सोडून दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्याच्या मागणीचे निवेदन प्रभारी श्यौराज वाल्मीकी यांना ‘प्रतिकाँग्रेस’च्या पदाधिकार्‍यांनी सादर केले. मात्र, स्वाक्षरी करणार्‍या बहुतांश पदाधिकार्‍यांनी मागणी जागेपुरती मर्यादित असून उमेदवारीची नव्हे, असे स्पष्ट केल्याने शहराध्यक्षपदाला पर्याय सुचवण्यासह कोणत्याच विषयावर या गटात एकमत होत नसल्याचे चित्र आहे.

शहराध्यक्षपदावरून आकाश छाजेड यांना हटवण्यासाठी एक झालेल्या या नेत्या-कार्यकर्त्यांनी वर्षभरापासून वेगळी चूल मांडली आहे. या गटबाजीचे दर्शन गुरुवारी वाल्मीकी यांनाही घडले. ‘प्रतिकाँग्रेस’च्या पदाधिकार्‍यांची बाजू वाल्मीकी समजावून घेत असतानाच काही कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. नाशिक लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात काँग्रेसचे दोन आमदार असून, जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समित्यांची सत्ताही पक्षाकडे असल्याने पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करून त्यात म्हटले आहे की, पक्षनिरीक्षक श्रेष्ठींना चुकीची माहिती देत असल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडली आहे. ती आता काँग्रेसला सोडून नगरसेवक दिनकर पाटील यांनाच देण्यात यावी. यावर आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर यांच्यासह 30 पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. मात्र, या तिन्ही पदाधिकार्‍यांसह डॉ. शोभा बच्छाव यांनीही प्रभारींना दिलेले निवेदन केवळ जागा पक्षाला सोडण्यापुरते र्मयादित असल्याचे स्पष्ट केले. उमेदवारीसंदर्भात अद्याप चर्चादेखील होऊ शकत नाही; कारण मुळात पक्षाला जागा मिळणेच सोपे नाही. सध्या त्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित सदस्यांनी पाटील यांच्या नावाला संमती दर्शवली असली तरी त्यांनी स्वाक्षरी मागितली म्हणून दिल्याचेही या पदाधिकार्‍यांनी नमूद केले.