आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांवरून भाजप आमदार आमने-सामने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुकणे धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या २६६ कोटी रुपयांच्या प्रकल्पावरून आता भाजप आमदारांचे मतभेद समोर आले आहेत. एकीकडे आमदार बाळासाहेब सानप यांनी विरोध करून शासनाकडून स्थगिती आणली असताना आमदार सीमा हिरे यांनी मुकणे जलवाहिनीचे काम शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे तातडीने सुरू करण्याचे पत्र आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना दिले आहे.
धरणाचे दोन वर्षांपूर्वीचे २२० कोटींचे काम आता २९३ कोटींपर्यंत पोहोचल्यावर खासदार हेमंत गोडसे, तत्कालीन विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, आमदार सानप यांनी विरोध करीत या कामाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्राधिकरणाकडून अंदाजपत्रकाची तपासणी केल्यानंतर त्यात जवळपास ४९ कोटींची कपात झाली. जवळपास २४५ कोटी रुपयांमध्ये काम करता येईल, अशी सूचना ‘एमजीपी’ने केल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली होती. २७० कोटींपर्यंत हे काम करण्याची तयारी दाखवणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीचा देकारही अडचणीत आला होता.
फेरतपासणीत हे काम २६६ कोटींपर्यंत करण्याची तयारी झाल्यानंतर अचानक नगरविकास खात्याने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. नगरविकासमंत्री रणजित पाटील यांनी आमदार सानप यांच्या पत्रानुसार स्थगिती दिल्याचेही समोर आले होते.

दरम्यान, मंगळवारी महासभा असताना आमदार हिरे यांनी आयुक्तांना दिलेले पत्र चर्चेत आले आहे. हिरे यांनी दिलेल्या पत्रात मुकणे धरणातून नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम अत्यंत गरजेचे असून, एकाच कंत्राटदाराकडून काम करून घेतल्यास गुणवत्तेकडेही लक्ष देता येईल, असे म्हटले आहे.
मोठी लॉबी कार्यरत
मुकणेधरणाच्या जलवाहिनीचे काम करावे वा करू नये, या दोन्ही मागण्यांसाठी दोन गटांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाल्याचे समजते. या लढाईत भाजपच्या आमदारांनी उडी घेत एकमेकां विरोधात दंड थोपटल्यामुळे चुरस वाढली आहे. दरम्यान, सत्ताधारी मनसेने तूर्तास चुप्पी साधली असून, मंगळवारी होणाऱ्या महासभेत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.