आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Administration Take Lesson On UPSC,MPSC

यूपीएससी, एमपीएससीचे जिल्हा प्रशासनाकडून धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नागरीसेवेत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने नववर्षाची एक भेट देऊ केली आहे. मुंबई, पुणे किंवा दिल्लीएेवजी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने जिल्हास्तरावरच यूपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले अाहे. या विद्यार्थ्यांसाठी वाचनालयदेखील उभारले जाणार असल्याने त्यांना अभ्यासाचे सर्व साहित्यही तेथेच मिळणार आहे.

इच्छा असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी काहींना स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी नांदेड आणि सांगलीत यूपीएससी आणि एमपीएससीचे सुरू करण्यात आलेले प्रशिक्षण शिबिर आता नाशिकमध्ये सुरू होणार अाहे. त्यासाठी नुकतेच या परीक्षांमधून गेलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी पाचारण केले जाईल. ते त्यांचे अनुभव या विद्यार्थ्यांसोबत कथन करतील. यासाठी डीपीसीतील नावीन्यपूर्ण योजनेतून काही निधी घेतला जाईल. पुस्तके किंवा इतर बाबींसाठी सीएसआरअंतर्गत निधी उपलब्ध करत विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरच दर्जेदार मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ग्रंथालयाचीही सुविधा
नियमितअभ्यासासाठी ग्रंथालय सुविधा दिली जाणार आहे. साधारणत: २०० विद्यार्थी बसू शकतील अशी जागा प्रशासन शोधत अाहे. पुस्तके सीएसआरद्वारे मिळविली जातील. इंटरनेटचीही सुविधाही असेल. प्रवेश परीक्षेनंतरच पात्र विद्यार्थ्यांना ग्रंथालयात प्रवेश मिळेल, असे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.

११ जानेवारीला प्रशिक्षण
११जानेवारीला दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात विशेष मार्गदर्शन शिबिर होईल. भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१४च्या बॅचच्या तसेच सध्याच्या सहायक जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी आणि याच बॅचचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे मार्गदर्शन करतील. प्रश्नोत्तर रूपात संवाद होईल. शिबिरात विद्यार्थ्यांची नोंदणी होईल. प्रत्येक महिन्यात कार्यशाळेच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवार मार्गदर्शन करतील.