आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा बँकेच्या सभेनंतर किरकोळ धक्काबुक्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शनिवारी दुपारी झालेली सभा वादळी ठरली. नेहमीप्रमाणे सभा गुंडाळण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच काही सभासदांनी व्यासपीठावर येत संचालकांना किरकोळ धक्काबुक्की केली. अध्यक्ष अद्वय हिरे यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न झाला. सभेनंतर विरोधी गटाचे संचालक आमदार अँड. माणिकराव कोकाटे यांनी सभा घेत बँकेच्या कारभारावर कोरडे ओढले.

नवीन सहकार कायद्यातील उपविधी स्वीकारण्यासाठी शनिवारी बँकेच्या जुन्या कार्यालयात अध्यक्ष अद्वय हिरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. अद्वय हिरे सभागृहात येत असतानाच सभासदांनी त्यांना कांदा, द्राक्ष, डाळिंब यांच्या पीककर्जात केलेली घट या मुद्यांवरून घेराव घातला. त्यांची समजूत काढत हिरे व्यासपीठावर पोहोचले. त्यानंतर अँड. माणिकराव कोकाटे यांनी उपविधीसंदर्भात काही सूचना केल्या. संचालक दिलीप बनकर यांनीही कोकाटे यांनी केलेल्या सूचनाच योग्य असून, त्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी करताच एका सभासदाने उठून उपविधी मंजूर आहे असा ठराव करा, अशी मागणी केली. त्यानंतर लगेचच राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.

.आणि सभासदांचा बांध फुटला : सभा गुंडाळण्याचा हा प्रकार पाहून काही सभासद संतप्त झाले. त्यांनी आरडाओरडा करीत व्यासपीठाकडे धाव घेतली. यात काहींनी धक्काबुक्की केली. त्यानंतर बाजूलाच बसलेल्या अध्यक्ष अद्वय हिरे यांच्याकडे काही सभासद वळाले. मात्र, संचालक आमदार शिरीष कोतवाल यांनी मध्ये पडत त्यांचा बचाव केला. या वेळी काही सभासदांनी हिरे यांना संरक्षण कडे करून मागील दाराने सुरक्षित सभागृहाबाहेर नेले.

कोकाटेंची सभा : सभा गुंडाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आमदार अँड. माणिकराव कोकाटे यांनी सभासदांची समजूत काढण्यासाठी वेगळी सभा घेतली. अशाप्रकारे सभा होणार असतील तर बँकेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आम्ही सातत्याने चांगल्या कारभाराची मागणी करीत आहोत, बँकेची कलम 79 अन्वये चौकशी आणि फेरलेखापरीक्षणही सुरू आहे. विधिमंडळात बँकेच्या कारभाराबाबत प्रश्न विचारले जात आहेत तरीही असाच कारभार सुरू राहणार असेल तर बँकेचे भवितव्य धोक्यात असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. नव्या उपविधीमुळे पेठ, सुरगाणा या आदिवासीबहुल तालुक्यांचे नुकसान होणार आहे. यावर या सभेत चर्चा होणे अपेक्षित होते, याकडे लक्ष वेधत सभा गुंडाळल्याने कोणताही विषय मंजूर झालेला नसून, ही सभा रद्द करून पुन्हा नवीन सभा बोलाविण्याची मागणी मुख्यमंत्री, सहकार आयुक्तांकडे करणार असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. या वेळी व्यासपीठावर संचालक नरेंद्र दराडे, देवीदास पिंगळे, राजेंद्र भोसले, आमदार शिरीष कोतवाल उपस्थित होते.

सर्व विषय मंजूर : या सभेत कर्मचार्‍यांची वयोर्मयादा 58 वरून 60 करणे, पिंपेन प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे, जिल्ह्यात सटाणा, उगावसह चार ठिकाणी बँकेच्या इमारती बांधणे, दमण गंगा-नदीजोड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात मंजुरी देण्यात आल्याचे सत्ताधार्‍यांनी सांगितले.

नव्या संचालक मंडळाची रचना अशी : सभेत मंजूर झाल्याप्रमाणे, आता नव्या संचालक मंडळात दोन महिला, एक अनुसूचित जाती जमाती, एक भटके विमुक्त, दोन छोट्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी.