आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कोटींचा धान्य अपहार, तहसीलदार निलंबित, सुरगाण्यातील घोटाळा, सात जणांवर गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शासकीय गोदामात रेशनच्या धान्याचा प्रत्यक्ष साठा न ठेवता गहू, तांदळू आणि साखरेसह सुमारे ३ हजार मेट्रिक टन धान्याचा अपहार झाल्याचा प्रकार सुरगाणा तालुक्यात उघडकीस आला. या धान्याचे मूल्य शासकीय दरानुसार ९५ लाख असून बाजारभावानुसार ५ कोटी ०६ लाख रुपये अाहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध सुरगाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे, तर तहसीलदार आर.आय. तडवी यांच्यासह चार जणांना निलंबित करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.

पुरवठा खात्याच्या समितीने नाशिक जिल्ह्यास प्राप्त धान्याची व त्याच्या वितरणाचीही तपासणी केली. त्यावेळी ऑगस्ट ते नोव्हेंबर २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीतच सुरगाणा तालुक्याला देण्यात आलेले धान्य आणि गाेदामातील साठ्याचा ताळमेळ लागत नसल्याचे निदर्शनास आले होते. मंजूर धान्य, गाेदामात किती धान्य आले, किती वितरित झाले. वाहतुकीचे कितीचे परवाने दिलेत, याची माहिती आणि त्याच्या पावत्या देणे आवश्यक असते. परंतु तसे झाले नव्हते. शिवाय मंजूर नियतनापेक्षाही जास्त धान्य गोदामातून कसे बाहेर पाठविले, असे प्रश्न उपस्थित झाले. या वितरणाच्या कुठल्याही पावत्या, पुरावेच नाहीत. त्यासाठी गोदामपाल रमेश दौलत भोये यास जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने जबाबात वाहतूक कंत्राटदार पैसे देत माझ्यावर दबाब आणून या धान्याचा अपहार करण्यास मला भाग पाडत असल्याचे सांगितले. याप्रकरणी अद्याप काेणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सात जणांवर कारवाई
गोदामपाल रमेश दौलत भोये, पुरवठा निरीक्षक एस.जी. धूम, वाहतूक निरीक्षक वाय.एम. मंडलिक या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले अाहे. त्यांच्याबराेबरच वाहतूक कंत्राटदार कंपनी मेसर्स एस. एन. मंत्रीमधील भागीदार संचालक मोरारजी भिकूलाल मंत्री, सुषमा मोरारजी मंत्री, संजय रामकृष्ण गडाख, श्रीराम मंत्री यांच्यावरही गुन्हा दाखल झाला अाहे.