आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांना जीवदानावेळी स्वत:चा जीवही पूरसेवकांना क्षुल्लक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘पुरात अडकलेल्यांचे जीव वाचवतो, त्या क्षणी मिळणाऱ्या समाधानापुढे स्वत:च्या जिवाची पर्वा क्षुल्लक वाटते...’ मेरी परिसरात राहाणारे जॉन भालेकर सांगत होते. गेल्या आठवड्यात नाशिकला झोडपणारा पाऊस गाेदावरीच्या महापुरात जीवितहानी टळण्याचे सर्वाधिक श्रेय कोणाकडे जात असेल तर ते जॉन भालेकरांसारख्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या ५० स्वयंसेवकांना! निव्वळ स्वयंसेवी प्रेरणेने ज्यांनी जिवावर उदार होत, मदतीसाठी पुकारणाऱ्यांना तत्काळ प्रतिसाद देत, अनेकांचे प्राण वाचवले. तारवालानगरात राहाणारे मनोज पवार, स्वत:चा लहानसा व्यवसाय असणारे किशोर ढगळे, भद्रकालीत दुकान चालवणारे जिशांत शेख, केटीएचएममध्ये शिकणारा अतुल भिंगारी आणि त्यांचे सहकारी आज नाशिककरांचा अभिमान ठरले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या या पथकाने बजावलेल्या कामगिरीमुळेच जीवघेणा पूर येऊनही जीवितहानी टळली. सिंहस्थाच्या निमित्ताने केलेले मायक्रो प्लॅनिंग नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला या पुराच्या वेळी मदतकार्यासाठी उपयोगी ठरले. २००८ च्या पुराच्या चौकशी अहवालातून पुढे आलेल्या कमतरतांवर यावेळी आधीच मात केली हाेती. मे महिन्यातच निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासोबत देवळालीतील लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली हाेती.
कोणत्याही क्षणी आपत्ती उद्भवल्यास लष्कराची मदत घेण्याची वेळ आली, तर सज्ज असावे म्हणून पावसाळ्यापूर्वीच नद्यांच्या खोऱ्यांचे, पूर प्रवण क्षेत्राचे नकाशे देऊन त्यांच्याकडून पाहाणी करवून घेतली होती. त्यामुळेच ‘एनडीअारएफ’ची (नॅशनल डिझास्टर िरकव्हरी फाेर्स) तत्काळ लष्करी मदत नाशकात दाखल होऊ शकली. लष्कराच्या या टीमच्या बरोबरीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पन्नास स्वयंसेवकांनी पूरात जीव ओतून बचाव कार्य केले. विशेष म्हणजे कोणत्याही पदाचे कोंदण नसताना किंवा मानधनाची अपेक्षा करता. स्वयंस्फूर्ती हीच प्रेरणा असलेल्यांची या पथकात निवड केल्याचे वाघमारे यांनी सांगितले. त्यात नदी काठी वास्तव्यास असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात अाले. त्यांना पाण्याची, पुराची माहिती असते, पोहोण्याची सवय असते, या जमेच्या बाजू. सिंहस्थापूर्वीच्या एका खास प्रशिक्षणात थेट लाइफबोटी चालवणेच नाही तर त्यांची दुरुस्तीही हे स्वयंसेवक शिकले. म्हणूनच या पुरात अडकलेल्या पालखेडच्या दहाजणांना आणि कुंदेवाडीच्या तिघांना वाचवले. इतकच नाही तर एक पथक बोटीसह कोपरगावलाही बचावाची माेहीम फत्ते करून आले आहे. या पथकाची ही धडाडी कार्यापासून प्रेरणा घेऊन आता बरेच तरुण आपत्ती व्यवस्थापन पथकात सहभागी होण्यासाठी विचारणा करू लागले आहेत.
समाधान हीच कमाई
^पुरात यावेळी पाण्याचा वेग प्रचंड होता. लष्करी अधिकारीही विचारात पडले होते. पण, आम्ही मागचा-पुढचा विचार नाही केला. आपला नातलग पुरात अडकला असताना जसा त्याला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा केली नसती, तशीच या बचावकार्यातही केली नाही. लोकांचे जीव वाचवल्यावर मिळणारे समाधान हीच आमची खरी कमाई. -जॉन भालेकर, पथकातील सदस्य

तत्काळ प्रतिसाद महत्त्वाचा
^कोणत्याही आपत्तीत तत्काळ प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा असतो. ३१ जुलैला मला आयएमडीकडून जाेरदार पावसाचा अंदाज मिळाला होता. तत्काळ मी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना त्याचे पत्रच पाठवले होते. सिंहस्थाच्या निमित्ताने आमचे शोध आणि बचाव कार्यासाठी स्वयंसेवकांचे पथक तयार हाेते. म्हणूनच एनडीअारएफ पोहोचण्याआधीच अामचे पथक पालखेडला पाेहाेचून लोकांना पुरातून वाचवू शकले. -प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
बातम्या आणखी आहेत...